श्रीकृष्ण जाणावा ..श्रीकृष्ण जगावा लागतो -----नाहीतर सहवास सर्वांना लाभला पण तो कोणाचा झाला ?
समुद्रमंथनातून जसं हलाहल बाहेर पडलं,तशी अनेक रत्ने बाहेर पडली!
त्यात होतं पारिजातक!
एकदा द्वारकेत सत्यभामेने कृष्णाकडे हट्ट धरला की,मला तो पारिजात माझ्या अंगणात हवा किती छान सुवास आहे त्याला! तो पारिजातक माझ्या अंगणातचं लावा.
कृष्ण हसला,त्याने समजुतीच्या स्वरात सत्यभामेला सांगितलं, "सत्यभामे,पारीजातक हा अमूल्य आहे !" त्याचा सुवास जितका मनमोहक,तितकं त्याचं बहरणं सोप्पं नाही.पारिजातक एका जागेवरून दुसऱ्या मातीत हलवला तर रुजत नाही आणि रुजला तर,याची फुलं मालकीच्या अंगणात पङत नाहीत.
पण स्त्री हट्टापुढे कृष्णाचं काही चालेना.
रुक्मिणीने ही तात्काळ ते झाडं सत्यभामेच्या अंगणात लावायची अनुमती दिली,सत्यभामेला खूप आनंद झाला.पारिजातक तिच्या अंगणी लागला,रुजलाही ! पण बहर मात्र सगळ्या रुक्मिणीच्या अंगणात पडू लागला.
आता सत्यभामेला कळून चुकलं, आपण नको तो हट्ट करून बसलो.
फुलं तर गेलीचं,पण आपण सुखाला ही मुकलो आणि पर्यायाने कृष्ण पुजेला ही दुरापास्त झालो.आणि पश्चातापाशिवाय तिच्याकडे काहीच उरलंही नाही.
श्रीकृष्ण आणि राधा....
राधा कृष्णाचे प्रेम म्हणजे भौतिक प्रेम नसून,
आध्यात्मिक प्रेम होते.
देवाचे आपल्या भक्तावर किंवा भक्ताचे त्याच्या आराध्यावर जितके पराकोटीचे प्रेम असू शकेल, ते प्रेम म्हणजे राधा-कृष्णाचे प्रेम होय. राधेच्या निस्सीम भक्तीमुळे ती कृष्णाशी अद्वैत पावली होती.
त्यांच्यात द्वैत भाव उरलाच नव्हता.
गोष्ट साधी,सोपी आणि सरळ पण...
आयुष्यात माणसाने कुठला हट्ट धरावा आणि त्यापायी आहे तेही सुख गमवावं, यासारखं दुर्दैव नाही.
कृष्णाने आयुष्यभर सगळ्यांना हेच सांगितलं.
जे आपलं ते नशिबाने तुमच्याकडे येईलचं,
वाट पहा.
हव्यासाने मात्र जे जवळ आहे,
तेही गमावून बसाल.
नशीब,आयुष्य आहे तसे स्वीकारा.त्यात बदल करायचा प्रयत्न केला तर त्याचं मूळ अस्तित्व तर बदलतंचं पण त्याचबरोबर तुमच्याकडे येतं ते नैराश्य.
युधिष्ठीर,दुर्योधन,द्रौपदी आणि अगदी भिष्मही यातुन सुटले नाहीत.
आपल्या हक्काची गोष्ट नसताना तिचा अट्टहास करणे किंवा त्यागलेल्या गोष्टींचा मनात अहंकार धरणे,या दोन्ही गोष्टी माणसाला शुन्य करतात.
भगवंताने प्रत्येकाला काही ना काही कारणाने वेगवेगळे घडवलेय.सगळीकडे समानता येऊ शकत नाही आणि आपणही हा अट्टाहास करणं चुकीचं असते.
कृष्णनीती हेच सांगते...
सर्व काही प्रेमाने जिंकता येतं,पण तिथे हव्यास असला की त्या गोष्टी आयुष्यात येऊनही निरर्थकचं होतात.
राधा कृष्णप्रेमात आकंठ बुडालेले होती,संसार सागरही तिने त्याच तंद्रीत पार केला.
मीरेची भक्ती इतकी,की तीने राजयोग टाळुन कृष्णभक्तीत आयुष्य कंठाला,आणि योगायोगाने या दोघींनाही 'कृष्ण' भरभरून मिळाला, तिथे तक्रारीला जागाचं नव्हती.
तीचं गोष्ट रुक्मिणीची कृष्णजन्म सोडून,कलियुगातही भीमेकाठी २८ युगांपासुन,पांडुरंगा सोबत एका विटेवर उभी ठाकलीये ! अजून "कृष्णसंग" काय हवा?
सत्यभामेला पती म्हणून लाभलेला कृष्णं कधी कळलाचं नाही.
कृष्णा जवळ आहे,याही पेक्षा इतर गोष्टी माझ्याकडे नाहीत,याचं वैषम्य तिला जास्त होतं,त्यामुळेचं आयुष्याचा जोडीदार कृष्णा असुनही,तिला तो भेटलाचं नाही.
कृष्ण अर्जुनाला,विदुराला, इतकंचं काय अगदी कर्णालाही भेटला कारण त्यांच्या अंतर्मनात कृष्ण होता,त्यावर श्रद्धा होती. तिनेचं विनासायास सर्वांना कृष्णलीलेत सामावुन घेतलं!
कृष्ण त्याच्या पायाशी त्यानी कधी कुणाला येऊचं दिलं नाही,कारण त्याच्याजवळ जो गेला,
त्या प्रत्येकाला त्यानं हृदयस्थ केलं ! त्यासाठी त्याच्यावर अढळ श्रद्धा हवी.
केवळ भक्तिमार्गाने कृष्ण भेटेल की नाही,नाही माहित पण त्यावर श्रद्धा ठेवली तर तो नक्कीचं हृदयस्थ करतो.
भक्ती आणि श्रद्धेत हाच तो फरक आहे.
भक्ती स्वार्थी असते,इच्छा पूर्ण झाली तर भक्ती पुढे कशात रूपांतरित होईल पण मनो इच्छित नाही पूर्ण झालं तर, देवही बदलला जातो !
भक्ती म्हणजे अंधविश्वास त्याचं खरं रुप काय ते नाही सांगु शकतं,
पण श्रद्धा म्हणजे कृष्णाचं, कृष्णा वरच्या चिरंतन विश्वासाचं नावं,फलित,मुक्ति,मग तुम्ही काहीही म्हणा....आणि म्हणुनचं कृष्णं दिसायला कितीही अवखळ,सोपा,सरळ वाटला तरी,त्याला समजणं,वाटत तितकं सोपं नाही.
त्यासाठी मनापासून कृष्णं अनुभवावा लागतो,
कृष्णंं जगावा लागतो आणि मुख्य म्हणजे कृष्ण हृदयी उतरवावा लागतो,
नाहीतर सत्यभामेसारखा पश्चात्ताप,रुखरुख नित्याचीचं पदरी येईल.
*म्हणून कृष्ण(भगवंत) जगावा लागतो.*

No comments:
Post a Comment