।। ओम गं गणपतये नमः ।।
गणेशोत्सव पुष्प ५


श्री गणेशाचा विवाह व अग्रपूजेचा मानदेशभरात गणेशोत्सव जल्लोशात साजरा होत असताना पाहायला मिळतो . गणेश चतुर्थीपासून हा उत्सव दहा दिवस साजरा करण्याची परंपरा आहे, त्यानंतर बाप्पाच्या मूर्तीचे श्रद्धेने विसर्जन केले जाते. जस जसा वेळ जात राहतो, तसतशी बाप्पाच्या प्रस्थानाची वेळही जवळ येत जाते गणेश उत्सवानिमित्त आम्ही तुम्हाला बाप्पाशी संबंधित अनेक महत्वपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहोत .
आज या पुष्पात आपण गणपतीच्या लग्नाबद्दल बोलणार आहोत.
आपले लाडके गणपती बाप्पा हे भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे धाकटे चिरंजीव. गजानन हे शिव आणि पार्वती या दोघांचेही लाडके. गणरायांचा विवाह हा रिद्धी आणि सिद्धी या दोन बहिणींशी झाला होता.
सर्वांना माहित आहे की भगवान गणेशाचे दोन विवाह झाले होते, एक रिद्धीशी आणि दुसरे सिद्धीशी आणि त्यांच्यापासून त्यांना दोन पुत्र झाले, ज्यांना आपण शुभ आणि लाभ म्हणून ओळखतो. पण तुम्हाला माहित आहे का की भगवान गणेशाचे दोन विवाह का झाले, भगवान गणेशाला रिद्धी आणि सिद्धी या दोघांशी लग्न करावे लागले, अशी परिस्थिती काय होती, त्यामागील रहस्य काय आहे आणि पौराणिक कथांमध्ये त्याचे वर्णन काय आहे? ते जाणून घेऊया.
श्रीगणेशाच्या विवाहासंबंधी मुख्यतः दोन कथा प्रचलित आहेत. यातील एका कथेत तुळशीचे वर्णन आहे, त्यासोबत गणपतीला तुळस का अर्पण केली जात नाही, हे देखील सांगितले आहे. पौराणिक कथेनुसार, एकदा भगवान गणेश तपश्चर्या करत असताना तेथून जात असलेल्या तुळशीने त्यांना पाहिले आणि ती भगवान गणेशावर मोहित झाली. तिला त्यांच्याशी लग्न करायचे होते. परंतु भगवान गणेशाने ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली होती, म्हणून त्यांनी तुळशीशी लग्न करण्यास नकार दिला. आपल्या लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या तुळशीने गणेशाला शाप दिला की त्याची दोन लग्ने होतील. यावर भगवान गणेशाने तुळशीला शापही दिला की तिचा विवाह राक्षसाशी होईल. त्यानंतरही गणेशाला तुळशी अर्पण करणे वर्ज्य मानले गेले आहे.
आणखी एका आख्यायिकेनुसार, भगवान गणेशाच्या शरीराच्या रचनेमुळे, कोणीही त्याच्याशी लग्न करू इच्छित नव्हते. यामुळे त्रासून त्यांनी ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली. यासोबतच त्यांनी इतर कोणाचेही लग्न होऊ दिले नाही. कोणाचे लग्न असले की त्यात विघ्न निर्माण करायचे. त्यांचे वाहन मुषक यांनीही त्यांना त्यांच्या कामात साथ दिली. त्यांच्या या सवयीमुळे देवी-देवता खूप अस्वस्थ होऊ लागले.
एके दिवशी ते या समस्येबद्दल ब्रह्माजींकडे गेले. देवी-देवतांच्या समस्या ऐकून भगवान ब्रह्मदेवाने आपल्या दोन मानस मुलींना भगवान गणेशाकडे शिक्षणासाठी पाठवले. भगवान गणेशाने ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे पालन केले आणि त्यांच्या दोन्ही मुलींना शिकवायला सुरुवात केली. दरम्यान, कोणत्याही लग्नाची बातमी आली की, रिद्धी सिद्धी भगवान गणेश आणि मुषक राज या दोघांचे लक्ष वळवायची, त्यामुळे हळूहळू लग्ने होऊ लागली. पण ही गोष्ट गणपतीपासून फार काळ लपून राहू शकली नाही. रिद्धीसिद्धीच्या या कार्याची माहिती मिळताच ते प्रचंड संतापले. ते रिद्धी सिद्धीला शाप देणार होतेच, तेव्हा ब्रह्माजी तिथे पोहोचले आणि त्यांनी भगवान गणेशाला रिद्धीसिद्धीशी लग्न करण्याचे सुचवले. ब्रह्माजींच्या सूचनेनुसार, भगवान गणेशाने रिद्धी सिद्धीशी विवाह केला आणि अशा प्रकारे त्यांची दोन लग्न झाली .

आता आपण पाहू सर्व देवतांमध्ये गणेशासच अग्रपूजेचा मान का?पद्मपुराण सृष्टिखंडानुसार, माता पार्वतीच्या वरदानानुसार गणेशास हा मान प्राप्त झालेला आहे. गणपतीने मातापित्यांची केलेली सेवा हे त्याचे मुख्य कारण. पद्मपुराणानुसार, सर्वप्रकारची तीर्थस्नाने, दान, यज्ञ, व्रते इत्यादी मातापितापूजनाच्या सोळाव्या हिश्शाचीदेखील बरोबरी करू शकत नाहीत.
गणपती अथर्वशीर्षातही 'ब्रह्मभूर्भुवःस्वरोम्' असे गणेशास संबोधलेले आहे. या ओम् चा उच्चार हा सर्व मंत्रांच्या आरंभी केला जातो; किंबहुना ओम्कारास अग्रक्रम दिलेला आहे. ओम्काराचे उच्चारण न करता विशिष्ट मंत्र पठण केल्यास त्याचे संपूर्ण फळ प्राप्त होत नाही, असे मंत्रशास्त्र सांगते.
गणेश हा ओम्कारस्वरूप असल्यामुळे सर्व धार्मिक व मंगल कार्यांमध्ये त्यास अग्रक्रम दिलेला आहे, तसेच गणेशापासूनच सर्व देवतांची उत्पत्ती झाली, असे अथर्वशीर्षात सांगितलेले आहे. त्यामुळे गणेशास 'आदिदेव' असेही म्हणतात. आदिदेव असल्यामुळे गणेशाचे स्मरण सर्वप्रथम करतात. आणखी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे पुराणांमध्ये गणेशाची सर्व देवतांनी स्तुती केलेली आढळते.लंबोदर गणेश सिद्धीबुद्धीचा दाता, गणांचा स्वामी म्हणून गणपती आहे. हत्तीचे मस्तक आणि उंदीर हे वाहन असलेला गणेश बुद्धीमान समजला जातो. आपल्याकडे कोणत्याही शुभकार्यापूर्वी अथवा कोणत्याही देवाची पूजा करण्यापूर्वी सर्वप्रथम गणेशपूजा (Ganesh Puja) केली जाते. आरती म्हणताना सुद्धा आधी गणपतीची म्हंटली जाते आणि मग बाकी देवांची आरती म्हंटली जाते. त्यामागे कांही कारणे सांगितली जातात व त्यासंदर्भात काही कथाही आहेत. चला जाणून घेऊयात...
असे म्हणतात, की पार्वतीमाता स्नान करत असताना पहार्यावर तिने गणेशाला बसविले होते. शंकर महादेव आल्यानंतरही गणेशाने त्यांना आत सोडले नाही तेव्हा रागावून त्यांनी त्याचे शिर धडावेगळे केले. मुलाची ही स्थिती पाहून पार्वती भयंकर संतापली तेव्हा तिला शांत करण्यासाठी शंकरांनी हत्तीचे डोके तोडून ते गणेशाला लावले. तरीही पार्वतीचा राग गेला नाही. तेव्हा शंकराने तिची समजूत काढताना पार्वतीला तुझ्या मुलाला कुणीही कुरूप म्हणणार नाहीत आणि सर्वप्रथम त्याचीच पूजा केली जाईल असा वर दिला.
दुसर्या कथेनुसार, सर्व देवतांमध्ये अग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा यावर वाद सुरू झाला. सर्व देव विष्णुंकडे गेले तेव्हा विष्णु त्यांना घेऊन महादेवांकडे गेले. तेव्हा अशी तोड निघाली की सर्व देवतांनी विश्व परिक्रमेला जावे व ज्याची प्रदक्षिणा सर्वप्रथम पूर्ण होईल त्याला अग्रपूजेचा मान दिला जाईल. सर्व देवता आपापल्या वाहनांवर बसून निघाल्या तेव्हा गणेशाने बुद्धीचातुर्याने पार्वती व शंकर यांनाच प्रदक्षिणा घातली. माता म्हणजे पृथ्वी व पिता म्हणजे आकाश.त्यामुळे मातापित्यांना घातलेली प्रदक्षिणा म्हणजेच विश्व परिक्रमा. अशा तर्हेने ही स्पर्धा गणेशाने जिंकली व त्यामुळे त्याला अग्रपूजेचा मान मिळाला असं म्हंटल जाते.
हे पुष्प अष्टविनायकांचे चरणी समर्पित . सकल विश्वाचे कल्याण हो ,सर्वत्र सत्कर्म करणार्याचे कल्याण हो . सर्वत्र मंगल हो . हिंदुस्तान विश्वात अग्रेसर हो ,हीच गणेशाचे चरणी विनम्र प्रार्थना
।। ओम गं गणपतये नमः ।।
.jpeg)
No comments:
Post a Comment