Tuesday, August 19, 2025

गणेशोत्सव विशेष. - गणपतीची मुर्ती कशी असावी ? - पुष्प २

 

।।ओम गं गणपतये  नमः ।।

गणपती उत्सव एक पवित्र  सामाजिक आणि धार्मिक उत्सव ... पुष्प  २



  💐  गणपतीची मुर्ती कशी असावी  ?

१) गणपती १ फुटांपेक्षा जास्त मोठी मुर्ती नसावी,

२) मुर्ती एका व्यक्तीला सहज उचलुन नेता व आणता आली पाहिजे,

३) सिंहासनावर किंवा लोडाला टेकुन बसलेल्या विश्राम अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम.

४) साप, गरुड, मासा, किंवा युद्ध करतांना व चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये, 

५) शिवपार्वती च्या मांडीवर बसलेला गणपती मुळीच घेऊ नये, 
कारण शिव पार्वती ची पुजा लिंगस्वरुपातच केली जाते शास्त्रात मुर्ती निषिद्ध आहे, सध्या बाजारात  अनेक सत्पुरुष देव देवतांचे  मुखवटे किंवा त्यांच्या बसण्याच्या आसन  पद्धती नुसार मूर्ती  बनवल्या जातात शक्यतो फक्त गणपतीच्या  सध्या सरळ आसनावर बसलेल्या मूर्ती आणाव्यात.

६) गणेश मुर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घरी आणूनये, 

७) गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मुर्ती मधे देवत्व येत नाही, तोवर ती केवळ माती समजावी.विधीवत प्राणप्रतिष्ठा करावी,

८) मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याअगोदर काही कारणास्तव मुर्ति भंग झाल्यास अजिबात घाबरू नये, त्या मुर्तीस दहीभात नैवेद्य दाखवून त्वरीत विसर्जन करावे, व दुसरी मुर्ती आणुन प्रतिष्ठापना करावी, मनात कोणतेही भय व शंका आणु नये.

९) कुटुंबात किंवा नात्यात मृत्यु झाल्यास सुतकात घरातील व्यक्ती ऐवजी, शेजारी, मित्रमंडळी यांचे करवी पुजा नैवेद्य दाखवून घ्यावा,गणपती विसर्जनाची घाई करू नये, 

१०) गणपती प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद व मद्य मांसाहार अजिबात करू नये, 

११) गणपती ला साधा भाजी भाकरीचा नैवेद्य रोज दाखवला तरी चालतो, केवळ आंबट व तिखट पदार्थ नसावेत, दही+साखर+भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे,

१२) कोकणात मालवण भागात गौरी सणाला गौराईला  अभक्ष मांसाहार नैवेद्य दाखवला जातो, ही अत्यंत विकृत प्रथा आहे, गौरी ही साक्षात आदिशक्ती पार्वती आहे, पार्वतीला निषिद्ध पदार्थांचा नैवेद्य दाखवून  उपासना करू नका .

१३) विसर्जन मिरवणूक काढतांना टाळ मृदंग अभंग म्हणत परमात्म्याला निरोप द्या अश्लील नृत्य व गाणी वाजवून पवित्र उत्सवास विकृत  स्वरूप येऊ देऊ नका .कृपया हे लक्षात आपले दैवत आपल्या घरी येत आहे आनंदाने त्याचे स्वागत करा आणि प्रेमाने निरोप द्या .बाप्पाच्या आगमनाने घरदार ,समाज व सर्व सृष्टी आनंदून जाते  याचे भान ठेवून वागावे .
विनाकारण हा गणपती नवसाला पावतो म्हणून आपण अनावश्यक गर्दी करतो...विचार करा ..परमेश्वर तुमच्या घरी आला आहे  आणि तुम्ही नवस पूर्ती साठी दुसरीकडे रांगा लावायला जाऊ नका .
 
त्यापेक्षा घरातल्या गणपती समोर तासभर शांत बसावे. उपासना करावी .जप करावा  देवाला वेगवेगळे नैवेद्य दाखवा ..भजन स्तोत्रे म्हणा ...व चांगले आत्मपरिक्षण करावे...सरळ वागावे ... श्रीचरणी सेवा अर्पण करा

घरातलाच गणपती आपल्या कुटुंबावर कृपा करील.गणपतीच्या घरातील व  बाहेरील मूर्ती  वेगवेगळ्या  असतील पण देवत्व एकच आहे . आपण गणपती मंडळाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी असाल तर सार्वजनिक गणपतीला भक्तिगीते व उत्तम सांस्कृतिक कार्यक्रम करा..आपल्याच भागातील व्यक्तींच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करा... स्वच्छतेचे अभियान राबवा .

💐💐: गणपतीउत्सव. गणपती पूजा यादी 
(फक्त स्मरण म्हणून )

अ) गणपती प्रतिष्ठापना सामानाची यापूजादी ..

(💐)हळद, कुंकू, अक्षता, शेंदूर अष्टगंध, गुलाल, अत्तर, अत्तर वाहण्यासाठी थोडासा कापूस, उदबत्ती, धूप, कापूर, काडेपेटी, फुले, फुलांचा हार, दूर्वा, विड्याची पाने, पत्री (शमीचे पान, रुईचे पान, आघाडा, केवड्याचे पान इत्यादी), जानवे, पाण्याने भरलेला तांब्या, पळी आणि भांडे, ताम्हण, पंचामृत, तुपाची छोटी वाटी (निरांजनात तूप घालण्यासाठी), .समई , निरांजन कलश  विड्याची पाने फळे नारळ  प्रसादा साठी पेढे मिठाई पंचामृत , दूध  अभिषेक पात्र, पत्री .

💐 💐💐गणपती आरती, अर्थ...

 *सुखकर्ता दु:खहर्ता = सुख देणारा दुःख हरण करणारा..... 

*अजूबाजूकडून सतत बातम्या येत असतात. त्या सुखाच्या व दुःखाच्या पण असतात. त्यातील विघ्नाच्या, दुःखाच्या राहू देऊ नको....

*नुरवी = न उरवी, फक्त प्रेम पुरव, दुःखाचा समुळ नाश करतो.....*

*पुरवी प्रेम कृपा जयाची = त्याची कृपा झाली की प्रेमवर्षाव भक्ताला लाभ होतो.....*

*सर्वांगी सुन्दर उटी शेंदुराची = गणेश सर्वांगाने सुंदर आहे. त्याने शेंदुराची उटी लावली आहे.....*

*कंठी झळके माळ मुक्ताफळांची = त्याच्या कंठात मोत्याची माळ झळाळत आहे.....*

*जय देव जय देव जय मंगलमूर्ति |* *दर्शनमात्रे मन कामना पुरती ||धृ||*

*म्हणजे = हे देवा, तुझा जयजयकार असो. तु मंगलाची प्रत्यक्ष मूर्तीच आहेस. तुझ्या केवळ दर्शनानेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.....

*रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा = हे गौरीकुमारा रत्न जडवलेला मुकुटाचा पुढील भाग तुझ्या कपाळी आहे. रत्नखचित फरा म्हणजे रत्नांचा तुरा. जसा मोराला, कोंबड्याला तुरा असतो तसा. तुरे खोविती मस्तकी पल्लवांचे असे कृष्णलिला वर्णन आहे.....*

*चंदनाची उटी कुंकुमकेशरा = कुंकू आणि केशर मिश्रित चंदनाची उटी तु लावली आहे.....*

*हिरेजडित मुकुट शोभतो बरा = हिऱ्यानी जडलेला मुकुट तुझ्या मस्तकावर शोभून दिसत आहे.....*

*रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया = तुझ्या पायांतील वाळ्यांतील घूंगरां चा रुणझुण असा मंजूळध्वनी होत आहे.....*

*लंबोदर पीतांबर फणिवर बंधना = मोठे पोट असणाऱ्या, पीतांबर नेसलेल्या, कमरेला नागाचे बंधन (कडदोरा) असलेला.....*

*सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना = सरळ सोंड व वाकडे तोंड असणाऱ्या,म्हणजे वक्रमार्गाने (वाईट मार्गाने) चालणारे व बोलणारे अशांना शिक्षा करुन त्याना सरळ मार्गावर आणणाऱ्या, त्रिनयना (३ नेत्र असणाऱ्या).....*

*दास रामाचा वाट पाहे सदना = हे गणपते, मी रामाचा दास (समर्थ रामदासस्वामी) माझ्या घरी मी तुझी आतुरतेने वाट पहात आहे.....*

*संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना = हे सुरवरवंदना = सर्वश्रेष्ठ देवां कडून वंदिल्या जाणाऱ्या हे गजानना, सर्व संकट प्रसंगी तु मला प्रसन्न हो. माझा संभाळ कर.....*

*निर्वाणी = अखेरीच्या, देहत्यागाच्या वेळी तु माझे रक्षण कर ही तुझ्या चरणी नम्र प्रार्थना.....*

आता याचा गर्भितार्थ समजून घेऊया

*सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची |*
*या पहिल्या ओळीतल्या पहिल्या दोन शब्दांचे अर्थ सुख करणारा (देणारा) आणि दुःखाचा नाश करणारा असे होतात, पण पुढे विघ्नाची वार्ता कशाला? त्याचे उत्तर पुढील ओळीत आहे.....*

*नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची ||*
*म्हणजे विघ्नाची वार्ता नुरवी, तिला शिल्लक ठेवत नाही, शिवाय प्रेमाचा पुरवठा करते अशी ज्याची कृपा आहे. अशा त्या गणपतीचे वर्णन पुढील ओळींमध्ये आहे.....*

*सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची | कंठी झळके माळ मुक्ता फळाची ||*
*त्याने सर्वांगाला शेंदुराची उटी लावली आहे आणि चमकदार मोत्याची माळ गळ्यात परिधान केली आहे. अशा त्या मंगलमूर्ती गणेशाचा जयजयकार ध्रुवपदात केला आहे.....*

*जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती |* *दर्शनमात्रे मन कामना पुरती || १ ||*
*त्याचे फक्त दर्शन घेतल्यानेच मनातल्या कामना, इच्छा वगैरे पूर्ण होऊन जातात असे संत रामदासांनी म्हंटले आहे. ‘दर्शनमात्रे’ च्या जोडीला काही भक्त तर ‘स्मरणमात्रे’ च मनोकामना पूर्ण होतात असेही म्हणतात. पण ही जरा अतीशयोक्ती झाली कारण संपूर्ण समाधान मिळणे हे माणसाच्या स्वभावातच नाही. तो नेहमीच ‘काहितरी जास्त मागतच राहतो . शिवाय दोन शत्रू पक्षातल्या किंवा स्पर्धक भक्तांनी एकाच वेळी परस्परविरोधी कामना मनात बाळगल्या तर त्या दोन्ही कशा पूर्ण होणार?

*पण इथे मला थोडा वेगळा अर्थ लावावासा वाटतो. मनोकामना, या शब्दाचे विघटन करावे वाटते. मन पूर्ण करतो (म्हणजे या देहीचे त्या देही घातले, किंवा माझे मन तुझे झाले, एकरूपता, किंवा ध्यानात गण-ईश, असा अर्थ लावूयात) नि कामना ही. इथे तो ईश आहे...., गुणाधीश जो ईश सर्व गुणांचा आहे, म्हणून विघटनात्मक, विनाशात्मक, कामना तो कसा पूर्ण करणार. विद्या-अधिपती म्हणतो, मग तो फक्त सकारत्मक वृत्तीचे जोपासन करेन, सत्याची बाजू घेईन, मित्र-शत्रू हे शब्द आपल्यासाठी, तो तर फक्त भक्तालाच जाणतो.....

*या आरतीच्या दुसऱ्या कडव्यात राजसी थाटाच्या गजाननाच्या ऐश्वर्याचे साग्र-संगीत वर्णन केले आहे. गणपतीचे पितृदेव भगवान शंकर अंगाला भस्म लावून अगदी साधेपणे रहात असतांना दाखवले जातात, तसेच त्याची आई पार्वतीसुध्दा माहेरच्या ऐश्वर्याचा त्याग करून कसलेही अलंकार न घालता वावरतांना पुराणात दिसते, पण त्यांचा पुत्र गणेश मात्र नेहमी राजसी थाटात असतो.....*

*रत्नखचित फरा तुज गौरी कुमरा ।  *चंदनाची उटी कुंकुम केशरा ||*
*हिरे जडीत मुकुट शोभतो बरा |* *रुणझुणती नुपुरे चरणी घागरीया ||*
*पार्वतीच्या या पुत्राने रत्नखचित अलंकार परिधान केला आहे, त्याने सर्वांगाला लावलेल्या शेंदुराच्या उटीचा उल्लेख पहिल्या चरणात आलेला आहे, आता त्याच्या जोडीला सुगंधी चंदन आणि लालचुटुक कुंकुमाची भर पडली आहे. त्याच्या पायात रुणुझुणू वाजणाऱ्या नूपुरांच्या (पैंजणांच्या) छोट्या छोट्या घागऱ्यांपासून ते मस्तकावर धारण केलेल्या हिरेजडित मुकुटापर्यंत हा गणपती सुंदर सजलेला आहे.
* धर्मशास्त्रानुसार असा शेंदूर लावल्याने आपल्या स्वामींचं आयुष्य वाढतं. त्यांना कुठलेही विकार होत नाहीत......”

पूजनाच्या सोपस्काराचा शास्त्रार्थ तर आहेच पण वैज्ञानिक करणे देखील आहेत, शिवाय संत वचन, भक्तांची श्रद्धा, मूर्तीला स्पर्श करतानाची भावना, त्याला बाळ समजून किंवा सर्वाधीश समजून, समजून उमजून केलेली पूजा याची मजा काही औरच, ती फक्त अनुभवायची असते, शब्दामध्ये उतरवणे कठीण असते. आपल्या भावना त्याच्यापर्यंत पोचतात. याचे अनुभव देखील आपल्या सर्वांना आहेतच.....*

*भारतीय शिल्पकलेत प्रथमपासूनच गणेश गजानन, एकदंत व लंबोदर रूपात आहे. गणेशाच्या ध्यान, प्रार्थना व मंत्रही असेच रूपवर्णन करतात:*
*सर्वं स्थूलतनुं गजेन्द्रवदनं, लम्बोदरं सुन्दरं*
*प्रस्यन्दन्मद्गन्ध लुब्धमधुपब्यालोल गण्डस्थलम् |*
*दन्ताघात विदारितारिरुधिरैःसिन्दूरशोभाकरं*
*वन्दे शैलसुतासुतं गणपतिं सिद्धिप्रदं कामदम् || (गणेशध्यानम्)*

*नामदेवांनी पण गणेशस्तवनाचा अभंग लिहिला आहे. ते म्हणतात,*
*लंबोदरा तुझा, शोभे शुंगदंड | करीतसे खंड दुश्चिन्हांचा ||*
*चतुर्थ आयुधे शोभतासी हाती | भक्ताला रक्षिती निरंतर ||*

*तिसऱ्या कडव्याच्या पहिल्या दोन ओळींमध्ये गणपतीचे वर्णन असे केले आहे, त्याचे उदर (पोट) मोठे आहे, त्यावर नागाला (पट्ट्यासारखे) बांधले आहे, पिवळ्या रंगाचे धोतर तो नेसला आहे, त्याची सोंड सरळ पण तोंड वाकडे आहे, त्याला तीन डोळे आहेत असे वर्णन या आरतीमध्ये केले आहे, पण गणपतीच्या कुठल्याच चित्रात त्याच्या कपाळावर तिसरा डोळा काढलेला दिसत नाही. त्रिनयना हे सूक्ष्मातले ध्यान आहे. तिसरे नेत्र हे दिव्य अशा ज्ञानचक्षूचे द्योतक आहे. प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरातल्या मूर्तीला मध्यभागी तिसरा डोळा दाखवला आहे.....*

*लंबोदर पितांबर फणिवर वंधना |* *सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ||*
*दास रामाचा वाट पाहे सदना |*
*संकटी पावावे सुरवर वंदना ||*

*अशा वर दिलेल्या स्वरूपाच्या गजाननाची वाट रामाचा दास (रामदास) घरी बसून पहात आहे, या देवांनाही वंदनीय अशा देवाने संकटकाळात प्रसन्न व्हावे अशी प्रार्थना संत रामदासांनी केली आहे. (आणि निर्वाणी रक्षावे, या निर्वाणीच्या क्षणी आपले रक्षण करावे, अशी पुष्टी त्याला जोडून केली आहे). काही लोक शेवटची ओळ ”संकष्टी पावावे” असे म्हणून सगळा अर्थच बदलून टाकतात.....*

*सुखकर्ता दुखहर्ता या आरतीची शब्दरचना अशी अगदी सोपी आहे, त्यात खूप गहन अर्थ भरला आहे सर्वसाधारण जनतेला ती कळावी, पटावी म्हणजे ते या आरतीचा स्वीकार करतील असाच विचार त्यामागे असावा आणि तसा असल्यास तो कल्पनातीत प्रमाणात साध्य झाला आहे.....*

*तीनशे वर्षांनंतरही आज अक्षरशः कोट्यावधी लोक गणपतीची ही आरती म्हणतात आणि आज ती देशोदेशी पसरलेल्या मराठी माणसांच्या घरी म्हंटली जात आहे. या आरतीचे आणखी एक वैशिष्ट्य असे आहे की गणपती, गणेश, गजानन, विनायक यासारख्या कुठल्याच प्रसिध्द नावाचा समावेश या आरतीच्या कुठल्याही कडव्यात नाही, तरीसुध्दा यातल्या एकंदर वर्णनावरून ही त्याच देवाची आरती आहे यात कोणाला शंका येत नाही.....*


💐💐💐मोदक ...💐💐💐


 गणपती बाप्पाला आवडणाऱ्या मोदकांबद्दल माहिती घ्या -----

असं म्हणतात की हृदयाचा मार्ग उदराच्या रस्त्याने जातो. मग ते आपल्या आवडत्या व्यक्तीचं मन असो किंवा आपल्या आराध्य दैवताचं!

देवी देवतांच्या मांदियाळीत आहारप्रिय तुंदीलतनू देवता म्हणून श्रीगणेशाचं‌ रूप आपल्याला नेहमीच भावतं. आणि त्यासाठीच बाप्पांच्या स्वागताच्या तयारीत २१ मोदकांच्या नैवेद्याचं ताट सजतं.

असा हा गणरायालाच नव्हे तर आबालवृद्धांना प्रिय "मोदक" नेमका कधीपासून अस्तित्वात आला, कसा प्रचलित झाला हे जाणून घेणंही तितकंच रोचक आहे.

मोदकाच्या उत्पत्तीचे संदर्भ दोन काळात विभागावे लागतात. एक पुराण काळातला आणि दुसरा अलिकडच्या काळातला संदर्भ‌. दोन पुराण कथांमध्ये मोदकाचा उल्लेख आहे.

🚩 त्यापैकी एक पद्मपुराणातली कथा असं सांगतं की, एकदा देवीदेवता अमृतापासून सिद्ध केलेला दिव्य मोदक देवी पार्वतीसाठी घेऊन आले. देवी पार्वतीचे दोन्ही पुत्र कार्तिकेय आणि गणेश दोघंही त्या मोदकास भुलले. दोघांनीही तो मोदक आपणास हवा असा हट्ट धरला.

त्यावर देवी पार्वतीनं असा उपाय शोधला की जो धर्माचरणात श्रेष्ठ असेल त्याला या मोदकाची प्राप्ती होईल. त्यावर आपण जाणतोच की, कार्तिकेय तीर्थक्षेत्र परिक्रमेस निघून गेला तर गणेशानं मातापित्यांना प्रदक्षिणा घालून त्यांचं मन जिंकले. आणि तो मोदक गणेशाला प्राप्त झाला.

या कथेच्या वेगवेगळ्या आवृत्त्या असल्या तरी इथे झालेला मोदकाचा उल्लेख महत्त्वाचा आहे. अर्थात आपण सध्या ज्याला रूढार्थानं मोदक म्हणून खातो तोच तो दिव्य मोदक याचं स्पष्टीकरण मिळत नाही.

🚩 दुसरी कथा असं सांगते की, अत्री ऋषींची पत्नी अनसूया हिनं आदरभावानं भगवान शंकर, देवी पार्वती आणि श्रीगणेश यांना भोजनास आमंत्रित केलं. विविध प्रकारची पक्वान्नं त्यासाठी सिद्ध केली गेली. पण सर्व भोजन स्वाहा करूनही गणपती बाप्पांची भूक काही भागेना.

अडचणीत सापडलेल्या अनसूयेनं विचार केला की गोड पक्वान्नानं गणपती बाप्पांचं पोट निश्चितच भरेल. तिनं नव्याने पाकसिद्धी करत झटपट एक पदार्थ तयार केला. आणि अहो आश्चर्यम्! त्या पदार्थाच्या सेवनानंतर बाप्पांचं पोट भरलं. त्यांनी २१ ढेकर देऊन तृप्तीची पोचपावती दिली.

देवी पार्वतीनं कुतुहलानं अनसुयेला त्या पदार्थाची कृती आणि नाव‌ विचारले. तोच हा मोदक. आणि तेव्हापासून २१ मोदकांचा नैवेद्य गणेशाला दाखवला जातो, असं ही कथा सांगते.

🚩 उकडीचे मोदक कुठून आले?

अशाप्रकारे पुराणकाळापासून मोदकाचा उल्लेख आढळतो पण पाककृती तीच याची खात्री देता येत नाही. याचं कारण म्हणजे एकतर पुराणातील वांगी पुराणात शोभतात आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे प्राचीन काळापासून मोद देणारा तो मोदक या अर्थानं लाडवांनाही मोदक म्हटलं जायचं.

त्यामुळे तांदळाची उकड, आत खोबरं आणि गुळाचं गोड चूण ही पाककृती मोदक म्हणून कधी प्रचलित झाली हे पाहण्यासाठी पुराणकाळातून अलिकडच्या काळाकडे यावं लागेल.

इसवीसन ७५० ते १२०० या कालखंडात उकडीच्या मोदकांसारखा पदार्थ होऊ लागल्याच्या खाणाखुणा दिसतात. त्यात तांदळाची उकड समान असली तरी आतलं गोड सारण वेगवेगळ्या पद्धतीनं भरलं जात होतं.

नारळाचं चूण आणि उकड असा अचूक उल्लेख एकेठिकाणी आढळतो. पण त्या पदार्थाचा उल्लेख मोदक नाही तर 'ठडुंबर' असा केलेला दिसतो.

त्यानंतर आहारविषयक ग्रंथात 'वर्षिल्लक' नामक पदार्थाची पाककृती अगदी उकडीच्या मोदकांशी मेळ खाते. पण तिच्यात दुग्धजन्य पदार्थांचा वापर होत असे आणि त्यानंतर थेट प्रचलित पाककृतीसह सद्य नाम धारण करून मोदक अवतरतो.

🚩 इतर प्रांतातले मोदक

मधल्या काळातले धागेदोरे अधांतरी असले तरी काही संदर्भ जोडता येतात. आपल्याकडच्या अनेक पाककृती मूळ वेगळ्या नावांसह अस्तित्वात होत्या आणि कालांतरानं त्याच पाककृती भिन्न नावानं प्रसिद्ध झालेल्या दिसतात.

मोदक ही पाककृती तांदूळबहुल प्रांतात अधिक लोकप्रिय आहे. मात्र थोड्या फार बदलासह या एकाच पाककृतीची नावं‌ बदललेली दिसतात.

तमिळ 'मोदक' किंवा 'कोळकटै', मल्याळी भाषेत 'कोळकटै', कानडी भाषेत 'मोदक' किंवा 'कडबू', तेलगू भाषेत 'कुडुमु' अशी त्याची अनेकविध नावं आहेत.

उकडीच्या मोदकाप्रमाणेच पण वर टोक आणि कळ्या नसणारे, सारण भरून गोल वळलेले कोळकटै हे केरळ आणि दक्षिण तामिळनाडूत प्रसिद्ध आहेत.

🚩 ओरिसा, आसाम आणि बंगालमध्ये तांदुळपिठाच्या उकडीची पातळ पारी करून त्यात गूळ-खोबऱ्याचं सारण भरून घडी घालून केळीच्या पानांवर पातोळ्याप्रमाणे वाफवतात त्याला 'पीठा' म्हणतात. म्हणजे साहित्य तेच पण आकार आणि नाव वेगळं.

🚩 प्राचीन काळापासून भारतभरात पुजेसाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य वापरला जातो. बारकाईने पाहिलं तर मोदकांचा आकार हा श्रीफलासारखा दिसतो. पुजेतला नारळ आणि गूळ खोबरं यांचा यथोचित संगम साधत कुणा भक्तानं किंवा सुगरणीनं ईश्वराप्रती व्यक्त केलेला कल्पक आणि गोड भक्तीभाव म्हणजे मोदक.

जिथं जे पिकतं तेच नैवेद्याच्या ताटातून ईश्वराला समर्पित केलं जातं. महाराष्ट्राचा विचार केला तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात उकडीचे मोदक होतात तर विदर्भ, मराठवाडा इथं तळणीचे मोदक होतात.

ओला नारळ जिथं मुबलक उपलब्ध तिथं तशाप्रकारे आतलं चूण बनतं. जिथे ओला नारळ नाही तिथं सुक्या खोबऱ्याचा वापरही केला जातो.

आज मोदकाच्या आतल्या सारणाचं वैविध्य लक्षणीयरित्या बदललं आहे. मोदकाचा आकार तोच ठेवत काजू ,आंबा, चॉकलेट, सुकामेवा इतक्या वैविध्यपूर्ण पद्धतीनं मोदक तयार होतात की त्याला दाद द्यायलाच हवी. तरीही गणपती बाप्पा घरी विराजमान झाल्यावर नैवेद्यात पारंपरिक मोदकांचं स्थान अबाधित आहे.

मोदक वळता येणं ही कला आहे. केवळ सगळं साहित्य मोदकाचं आहे म्हणून कसाबसा वळलेला लाडूसदृश मोदक जिव्हातृप्ती करत नाही कारण हा पदार्थ त्याच्या आकारातून अधिक गंमत आणतो.

पांढरीशुभ्र उकडीची पारी, आतलं मिट्ट गोड चूण यांच्या आकार आणि प्रमाणाचं गणित अचूक जुळावं लागतं. मग कळीचं फूल व्हावं तशी पारीची एकेक कळी खुलवत तयार कळीदार मोदक आणि वर तुर्रेबाज टोक गाठणं ही एक कला आहे.

🚩 उकडीचे मोदक खाण्याचे फायदे ...

महाराष्ट्रातील महत्त्वांच्या उत्सवांपैकी एक असणारा म्हणजे गणपती उत्सव. सर्वांना माहीतच आहे की गणपतीला मोदक हा पदार्थ खूप आवडतो. पण उकडीचे मोदक खाण्याचे अनेक फायदे आहेत हे खूप कमी लोकांना माहित आहे. काय आहेत फायदे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

🚩 1) रक्तदाब नियंत्रणात आणतो-
मोदकामध्ये नारळ हा पदार्थ असल्यामुळे आपले रक्तदाब नियंत्रण राहण्यास त्यामुळे मदत होते. नारळ आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा पदार्थ आहे त्यामुळे आपले आरोग्य जपण्यास मदत होते तसेच रक्तदाब आटोक्यात आणण्यासाठी नारळामधील काही घटक फायदेशीर ठरतात.

 २) कोलेस्ट्रॉल कमी प्रमाणात असते–
मोदक हा तांदूळ, खोबरं, गुळ, नारळ, सुका मेवा तसेच अनेक घटकांच्या मिश्रणाने बनलेला असतो. त्यातील नारळ, सुका मेवा या घटकांमुळे चांगले कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरात येतात व वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करतात त्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रोल कमी करण्यास मोदक आरोग्यदायी ठरू शकतो.

🚩 3) सांधेदुखी आटोक्यात ठेवते–
मोदकांमध्ये तूप असल्यास गुडघ्याचे दुखणे कमी करण्यासाठी ते एक उपयुक्त औषध बनू शकते. कारण तुपा मधील काही घटक सांधेदुखीचा त्रास व अन्थ्राय्तीस समस्या आटोक्यात आणण्यास मदत होते.

🚩 4) ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते–
मोदकामध्ये असणारे घटक तांदूळ नारळ गुळ तूप यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते. त्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीमध्ये झटकन चढ-उतार होण्याचा धोका मोदक खाल्ल्यामुळे निर्माण होत नाही.

त्या मोदकाच्या आकाराच्या प्रेमात पडून वर तुपाची धार घेत किती मोदक गट्टम होतात याची बेरीज अस्सल खवय्या करत नाही. त्यावेळेपुरतं बाप्पासारखं विशाल मन आणि उदर आपल्याला आपसूक प्राप्त होतं.

श्री वरद विनायकाची आपण व आपल्या कुटुंबावर कृपा व्हावी हीच श्री चरणी प्रार्थना. 

|| शुभम भवतु || 

No comments:

Post a Comment