साधना / ध्यानधारणा पुष्प ३
आता असा प्रश्न विचारला जातो गुरूचा सहभाग काय असतो याचा विचार करूयागुरु व गुरुमंत्र किंवा गुरुदिक्षा ...
आज श्रींचे आज्ञेने आपण गुरू व गुरुमंत्र ग्रहण करणे व गुरुचेप्रति आपले असलेले समर्पण याबाबत विचार करू या .... एखाद्या साधकास सद्गुरू प्राप्ती होणे व त्यांचे गुरू कडून या साधकास दीक्षा किंवा गुरुमंत्र देण्याची आज्ञा होणे हे साधकांसाठी अत्यंत भाग्योदयाचे लक्षण आहे . गुरू केवळ एक गुरुतत्वाचा सेवक आहे व साधक व दत्तमहाराज यांच्यातील दुवा यानात्याने त्यांची आज्ञा होईल तसे मार्गदर्शन करतात.. एका गोष्ट मात्र निश्चित लक्षात ठेवायची ..कर्ते कारविते दत्त महाराज आहेत...गुरू फक्त मध्यस्थ . या मंत्र शक्ती ग्रहणात अनेक जबाबदऱ्या ही येतात हे फार महत्वाचे सर्वात महत्वाचे म्हणजे मन समाधानी व शांत ठेवले पाहिजे...परस्त्री ,परद्रव्य,व्यसने यांच्या पासून दूर राहून आपला आचार विचार उत्तम असला पाहिजे आहार शुद्ध घ्यावा .अन्यथा मंत्रदीक्षा घेण्याचे महत्वचं राहात नाही...त्यामुळे प्रथम विचार करा व निर्णय घ्या....क्रोध ,अहंकार व असक्तीचा त्याग करणे आवश्यक...
सामान्यपणे अध्यात्मीक क्षेत्रातला प्रत्येकजण गुरुमंत्र मिळावा म्हणून प्रयत्नरत असतो .गुरुमंत्र मिळाला म्हणजे काहीतरी फार मोठे साधन झाले असे समजतात. अनेक जण असे आहेत ज्यांनी तो घेतला आहे तर अनेक जणांना तो घ्यायचा आहे. पण या गुरुमंत्राच्या बाबतीत काही तरी गोड गैरसमज किंवा गोंधळ झाला आहे असे वाटते. कारण बरेच जण आपल्या कार्यसिद्धीसाठी जसे, नोकरी मिळावी, विवाह व्हावा, संतती व्हावी, घर व्हावे, रोग बरे व्हावेत यासाठी गुरुमंत्र मागत असतात. पण एक लक्षात घ्या की अशा कामना पूर्तीसाठी घेतलेला मंत्र हा गुरुमंत्र होत नाही तर ते कामना सिद्धीमंत्र होतात. गुरुमंत्र किंवा दीक्षामंत्र हा तुम्ही, गुरु आणि ते परमेश्वरी तत्व यांना सांधणारा सांधा असतो. त्यामध्ये कुठलीही कामना, इच्छा किंवा मागणे असा भागच नसतो ..
गुरुमंत्र म्हणजे एक अभिवचन असते, गुरुला दिलेले वचन असते, गुरुप्रति काया, वाचा, मनाने, तनमनधनाने, सर्वार्थाने केलेले निःसंशय समर्पण असते. 'उतणार नाही मातणार नाही घेतला वसा (मंत्र ) टाकणार नाही' मग काय वाटेल होवो असा ठाम निश्चय असतो. स्वेच्छेने पण पुर्ण विचारपूर्वक स्वीकारलेले बंधन असते. गुरुमंत्र घेईपर्यंतच तुम्हाला गुरुमंत्र घ्यायचा की नाही या स्वयंनिर्णयाचा अधिकार असतो. ज्याक्षणी तुम्ही गुरुमंत्र घेता त्याच क्षणी तुमची सर्व सुत्रे गुरुकडे जातात. तुमचा स्वयंनिर्णयाचा अधिकार संपतो. फक्त 'गुरुर्वाक्यं प्रमाणं' असे व्हावे लागते. म्हणूनच तर 'गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु..' असे म्हटले आहे. गुरुसाठी सर्व समर्पित करण्याची तयारी ठेवावी लागते. गुरुमंत्र म्हणजे गुरुप्रती संपूर्ण समर्पण, गुरुप्रती अढळ निष्ठा आणि गुरुवर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास.
पण एक लक्षात घ्या की गुरुमंत्र घेतल्याने तुमच्या कुठल्याही भौतिक समस्या सुटणार नाहीत. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव वगैरे कुणाच्याही समस्या सुटल्या नाहीत, उलटपक्षी त्या वाढल्या. गुरुमंत्र म्हणजे समस्या मुक्तिचे साधन नव्हे. तर आध्यात्मिक वाटचालीचा खडतर मार्ग आहे. गुरु आणि गुरुमंत्र तुम्हाला तुमच्या योग्यतेप्रमाणे, जसजसे तुम्ही पक्व होत जाल त्याप्रमाणे तुमची आध्यात्मिक प्रगती करत असतो. तुमची जन्म जन्मांतरीची भवबीजे, संस्कारबीजे, कर्मबीजे हळूहळू जाळून टाकत असतो. शुद्ध करत असतो. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी करत असतो. दुर्लभ वस्तू सहज प्राप्त झाली की असा संशय निर्माण होतो. म्हणून ह्रदयरुपी कसोटीवर कसून पारखून हे बघावयास हवे की आपल्याला चिंतामणि मिळाला आहे की काच? सोने मिळाले आहे की पितळ? तसेच जी दुर्लभ साधना तुम्हाला मिळाली आहे, त्यानुसार साधना करुन साधनेचे अलौकिकत्व अनुभवास येते किंवा नाही हे पाहिले पाहिजे.
नुसता संशय घेऊन साधनशून्य रहाणे योग्य नाही. संशय घ्यायचा, साधन करायचे नाही म्हणजे अनुभव काहीच येणार नाही. उलट संशय पिशाच्च अधिक बलवान होत जाणार.गुरुवाक्य, शास्त्रवाक्य आणि स्वानुभव हे तीनही मिळतील तर तत्वासंबंधी, गुरुसंबंधी आणि स्वत:संबंधी शंकाच राहणार नाही. अनुभवाशिवाय नुसत्या कल्पनेने, तर्काने, ज्ञानाने संशय दूर होत नाही. त्यासाठी साधनाच केली पाहिजे.
साधनेवर श्रद्धा, निष्ठा ठेवली की गुरुवर श्रद्धा, निष्ठा बसते. गुरुवर नि:संदिग्ध श्रद्धा असली की कल्याणच होते.संशय हे पतनाचे मूळ आहे म्हणून संशयाच्या आहारी जाऊ नये. संशयाने फार मोठे अनर्थ ओढवतात.
दीक्षा घेतल्यावर सद्गुरूंजवळ कसे वागावे? या बाबत प.पु गुळवणी महाराज यांनी भक्तांशी बोलताना काही नियम सांगितले ते सर्व संदर्भासाठी खाली देत आहे ...ही मार्गदर्शक तत्व म्हणून अभ्यास करावा...
- सद्गुरूंशी खोटे बोलू नये.
- फार बोलू नये.
- सद्गुरूंची निंदा करू नये.
- आपले बोलणे बरोबर नाही, असत्य आहे, या स्वरूपाचे शब्द तोंडात येऊ नये.
- गुरूंसमोर वेगळी पूजा करू नये.
- मर्यादा सोडून वागू नये.
- दीक्षा वगैरे विषयावर आपले प्रभुत्व दाखवणारे भाषण करू नये.
- सद्गुरूंचे आसन, अंथरुण, वस्त्रादि-कपडे, अलंकार, पादुका, चित्र इ. ना स्पर्श करून वंदन करावे.
- गुरू आज्ञा मोडू नये.
- सद्गुरूंना प्रत्युत्तर देऊ नये.
- दिवसा, रात्री, सदैव सेवकाप्रमाणे त्यांची आज्ञा पाळली पाहिजे.
- असत्य, अशुभ, वादविवाद इ. टाळावे.
- सद्गुरूंना न आवडेल असे करू नये.
- सद्गुरूकार्यातआळस करू नये.
- सद्गुरू कार्यात लौकिक इच्छा नसाव्यात.
- सद्गुरू कार्यात राग नसावा.
- सद्गुरूंच्या डोळ्याला डोळा भिडवून कधीही बोलू नये.
- सद्गुरूंना नमस्कार केल्याशिवाय ओलांडून वा समोरून जाऊ नये.संपत्ती, जात किंवा आश्रम इ. चा अभिमान नको.
- सद्गुरूंसमोर अद्वैताची भाषा करू नये.
- सद्गुरूंसमोर देपूजाही करू नये.
- सद्गुरूंसमोर पलंगावर निजू नये व तसेच समोर हात पाय पसऱून बसू वये.
- आळस, अंगविक्षेप समोर करू नये.
- जाता-येता सद्गुरूंच्या पादुकांना वंदन करावे.
- त्यांचे काम प्रसन्नतेने करावे.
- सद्गुरूंची सावली ओलांडू नये.
- त्यांचे पुढून तसेच जाऊ नये.
- अनवाणी जाऊन आधी गुरुगृहाला वंदन करावे.
- सद्गुरूंसमोर आपला शिष्य-संप्रदाय मिरवू नये.
- अहंकार करू नये.
- आपल्या गुरूंना त्यांच्या गुरूंसमोर नमस्कार करू नये.
- सद्गुरूंशी 'तुम्ही' सर्वनामान न बोलता 'आपण' सर्वनाम वापरून बोलावे.
- सद्गुरूंना वंदन करून त्यांचेजवळ बसावे.
- सद्गुरूंच्या आज्ञा घेऊन त्यांच्या जवळून जावे.
- सद्गुरूंसमोर काम, क्रोध, लोभ, मान घेणे, हसणे, स्तुती करणे, कुटिलता दाखविणे, ओरडणे, रडणे या गोष्टी करू नये.
- सद्गुरूंना ऋण देणे किंवा त्यांच्याकडून ऋण घेणे, त्यांना वस्तू विकत देणे या गोष्टी करू नये.
- सद्गुरूंच्या समाधानातून शिष्याला पूर्णत्व प्राप्त होते.
- सद्गुरूंच्या आठवणीत सर्व देवतांचे स्मरण अंतर्भूत आहे.
- गुरू, गुरू-मंत्र आणि इष्टदेवता या तीन वेगवेगळ्या गोष्टी नसून एकच आहे असे समजावे.
प्रत्येक भक्ताला,साधकाला वाटत असते की आपल्याला गुरूप्रसाद प्राप्त व्हावा.प्रसाद म्हटल्यावर खाण्याची वस्तू असे वाटते. गुरूप्रसाद हा वस्तूच्या रूपात नसून इतरही रूपात असू शकतो.
श्री गुरूंची उपासना करणे, नित्याने स्मरण करणे व त्यांच्या उपासनेचा ध्यास लागणे यातूनच गुरूप्रसादाची प्राप्ती होते. एकदा प्रसाद प्राप्त झाल्यावर ईश्वरी अनुभव आल्यावर आत्मनिरीक्षण करणे सोपे जाते. गुरूप्रसाद इतका प्रभावी असतो आपल्याला आपल्या आत्म्याचे प्रत्यक्ष दर्शन होते. हे दर्शन तेजोमय असते. जेव्हा ते अनुभवायला येते तेव्हा ते डोळे झाकले असतानाही दिसते,उघडे असतानाही दिसते. हे चैतन्य तेजस्वी व स्वयंभू असते.ज्या गुरूंची आपण सेवा करतो ज्यांच्या आश्चर्याला आपण येतो ते गुरुस्थान जन्मजन्मांतरी पुण्य केलेले आहे म्हणून आपल्याला प्राप्त झाले आहे. गुरूप्रसाद प्राप्त होणे हे पूर्वसुकृतावर अवलंबून आहे. पूर्वसुकृत श्रेष्ठ नसेल तर गुरूप्रसाद प्राप्त होणार नाही.
(आता बाकी उद्याच्या भागात पाहू पुष्प ४ )
।।शुभम भवतु ।।

No comments:
Post a Comment