।। श्री गुरू शरणं
।। पुष्प
२
साधना व ध्यानधारणा
साधनेतील एकाग्रता साधणे ... काय करावे ?
बऱ्याच साधकांची। अशी चिंता असते की मन एकाग्र होत नाही . मग यासाठी काय करावे ते आता आपण पाहू
💐साधना सफल होण्यासाठी मनाची एकाग्रता व ती साधण्यासाठी साधना असा बीजांकुरन्याय साधना आणि मनाची एकाग्रता या बाबतीत लागू पडतो. साधना करताना प्रथम देह स्थिर ठेवावा लागतो. त्यानंतर इंद्रये स्थिर ठेवावी लागतात. त्यानंतर इंद्रियांच्या मागून सैरभैर धावणारे मन हळूहळू स्थिर होऊ लागते. साधनेचे संपूर्ण यश पदरात पाडण्यासाठी साधकाने प्रथम आहार व आचारशुध्दी करावी. पूर्ण सात्विक आहार घेऊन शुध्द आचार ठेवणारा साधक हळूहळू निश्चित प्रगतावस्थेत पोचतो. ज्यावेळी अल्पकष्टात पुष्कळ धनप्राप्ती, स्त्रीविषयक विचार, दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न होणे, मृगजळवत सुखाच्या मागे धावणे, विविध समस्यांचे कर्तुत्व स्वतःकडे घेऊन त्यावर उपाय शोधत बसणे, परमार्थाला उपयुक्त नसणाऱ्या वस्तूंची प्रीती बाळगणे अशा गोष्टी जोपासल्या जातात, तेव्हा मनाचा कार्यव्याप मोठा असल्यामुळे त्याला स्थिर होण्यासाठी सवडच सापडत नाही. कार्यव्याप कमी करण्यासाठी वरील गोष्टी सोडून देण्याचा सराव करावा लागतो. इकडे साधना व तिकडे सराव अशा दोन्ही गोष्टी चालू झाल्यावर हळूहळू मनाची चंचलता नष्ट होऊ लागते.
*साधनेच्या काळात प्रारंभी मनामध्ये एकाचवेळी शेकडो विचार उद्भवतात. त्यांच्यावर नियंत्रण घालण्यापेक्षा ते तसेच उद्भवू द्यावेत, पण त्यांचेकडे लक्ष देऊ नये. असे करता करता एकदा उद्भवलेले विचार दुसऱ्या खेपेस सौम्य होतात व अशा क्रमाने त्यांची तीव्रता नष्ट होते. त्यानंतर मन हव्या त्या गोष्टीवर केंद्रित होऊ लागते. मनाला नेहमी वारांगनेची उपमा देतात. पण वारांगनेचा एक चांगला गुणधर्म म्हणजे एकावेळी ती एकाशीच रत होते. मनात शेकडो विचार उद्भवले तरी, एका क्षणी एकच विचार असतो. त्यामुळे त्याला चिंतनाचा व नामस्मरणाचा चाळा उपलब्ध करून दिला म्हणजे ते दुसरीकडे धावु पाहत नाही साधनेचा गाभा म्हणजे चिंतन मन न होय प्रारंभावस्थेत सगुणाचे व प्रगतावस्थेत निर्गुणाचे चिंतन मनन केल्यास ती साधना अती प्रभावी ठरते साधकाने शक्तिपात टाळणे अपरिहार्यच असते .
साधना करताना जी शक्ती साठते त्याची गंमत अशी आहे, की त्या शक्तीला विरुद्ध काही आलं – त्या शक्तीस्वरूपाच्या उलट काही मध्ये आलं तर ती शक्ती नाहीशी होते. आपली शक्ती – भगवंताच्या स्मरणाची शक्ती सूक्ष्म आहे. त्याच्या उलट स्थूल गोष्टी आहेत. त्या सूक्ष्मात जर स्थूल मिसळलं तर मिळवलेली शक्ती नाहीशी होते. आपल्याला शिकायचं काय आहे, तर जग हे परमात्मस्वरूप आहे. “कै ऐशी स्थिती येईल माझ्या अंगा| अवघे देखे जन ब्रह्मरूप||” सगळीकडे तोच आहे अशी माझी स्थिती व्हायची आहे. यासाठी आवश्यक काय आहे, तर सबंध जग निर्दोष पहायचंय. दोष पाहणं त्याच्या उलट.
म्हणून मी जर नामस्मरण करून निंदा केली तर शक्तिपात होतो. समजा तास दोन तास उत्तम जप झालेला आहे आणि मग बाहेर आल्यावर तुमची सून काय करते, तुमच्याशी नीट वागत नाही का? तुमचा मुलगा काय करतो, अहो अलीकडे काळ बिघडलाय, हे झालं की तासभर केलेला जप वाया जातो. याशिवाय जर एखाद्या माणसाचा द्वेष केला तरी हेच होणार. एक लक्षात ठेवावे, परमात्मस्वरूपाला प्रेमाशिवाय काही चालत नाही!
त्यापुढे साधनात साधकाने आचार विचार व विहार याबाबत सतर्क असले पाहिजे चुकीचे पाऊल पडणार नाही. हे शक्तीपातापासून साधकाने फार जपणं आवश्यक आहे!
🌹: साधकाची साधना योग्य प्रकारे चाललेली असेल तर त्याला अतींद्रिय असे अनुभव यायला सुरवात होते. किंबहुना असे अनुभव येणे हीच साधना योग्य मार्गाने चालू आहे याची खूण आहे. हे अनुभव म्हणजे काही वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धी असू शकतात.
पहिल्या टप्यात साधकाची आकलन शक्ती कमालीची वाढते. त्याच्या सहवासातील लोकांच्या मनातील विचार त्याला आपोआप कळायला लागतात ज्याला अंतर्मनातील जाण असे म्हणतात . जी व्यक्ती त्या साधकाची आठवण काढत असेल त्याची तीव्र आठवण साधकाला होऊ लागते. व्यक्ती समोर आल्यावरती ती कशी आहे,त्या व्यक्तीचा हेतू काय आहे हे त्या साधकाला जाणवायला लागते. प्रकाश दिसणे ,नाद ऐकू येणे ,सुगंध येणे ,सर्व सामान्य माणसावरती त्याची छाप पडायला सुरवात होते.स्वप्नात दृष्टांत होणे ,मार्गदर्शन मिळणे असे अनुभव साधकाला येऊ लागतात.
दुसऱ्या टप्यात साधकाला अधिक प्रगल्भ अनुभव यायला लागतात. निकटच्या किंवा परिचयातील व्यक्तीवरती कुठला कठीण प्रसंग येणार असेल तर साधकाचे मन अस्वस्थ होऊ लागते. बऱ्याच वेळेला समोरच्या व्यक्तीला पाहिल्यावरती त्याच्या जीवनात पुढे काय घडणार आहे याची साधकाला कल्पना येऊ लागते. भविष्य कथन सिद्धी याला म्हणू शकतो . साधक सहज बोलून जातो ते खरे व्हायला सुरवात होते जिला वाचा सिद्धी असे म्हणतात . दुसऱ्यासाठी केलेली प्रार्थना फळास येऊ लागते. ज्याला संकल्प सिद्धी असे म्हणू शकतो . रोग्याचे दुखणे कमी करता येऊ लागते. दुसऱ्याचा रोग निव्वळ स्पर्शमात्रे बरा करता येऊ लागतो. जंगली पशु,हिंस्त्र जनावरे , गुन्हेगारी स्वरूपाची माणसे सहजपणे वश होऊ लागतात.एकूणच सर्व प्रकारची माणसे साधकाला वश होऊ लागतात.
💐साधकाची प्रतिभा जागृत होते आणि त्याच्या प्रभावाखाली उत्तम दर्जाची काव्ये ,लिखाण,उत्तम दर्जाचे ग्रंथ लेखन आणि साहित्य निर्मिती घडू लागते. स्वतःकडे असलेले लुटून टाकले तरी कधीहि काहीही कमी पडत नाही. थोड्याशा अन्नात बऱ्याचशा व्यक्ती जेवून जाऊ शकतात. जेव्हा पैसा हवा असतो तेव्हा कुठूनतरी तो उपलब्ध होऊ शकतो. कठीण प्रसंगी कुठूनतरी मदत मिळून संकट निवारण होते.
तिसऱ्या टप्यात साधक आपल्या मर्जीने सूक्ष्म देहावाटे आपल्या शरीराबाहेर येऊ शकतो. इतकंच नाहीतर साधक दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करू शकतो ज्याला परकाया प्रवेश म्हटले जाते. परकाया प्रवेश हि फार मोठी सिद्धी मानली जाते . आपण केव्हा जाणार ते कळल्याने त्याला मृत्यूचे भय राहत नाही. इतकेच नव्हे तर आपल्या इच्छाशक्ती नुसार आपले मरण लांबवू शकतो आणि अनुकूल काळ पाहून आपल्या मर्जीनुसार तो देह ठेवू शकतो. सद्गुरू श्री शंकर महाराजांनी तब्बल ३/४ वेळा आपली महासमाधी आपल्या लाडक्या भक्तांच्या आग्रहास्तव पुढे ढकललेली होती .
असा हा साधक स्वतःच " सिद्ध " होण्याच्या मार्गाकडे वाटचाल करू लागलेला असतो किंवा जवळपास " सिद्धच " बनलेला असतो.
पावसचे " श्री स्वामी स्वरूपानंद " यांना व्यक्ती समोर आली की त्याचे याआधीचे जन्म आणि नंतर होणारे जन्म जणू काही एखादा सिनेमा पाहावा याप्रमाणे दिसत असत.
" श्री गुरुदेव रानडे " अत्यंत चिकाटीने आणि झोकून देऊन नामस्मरण/उपासना करीत असत. कालांतराने त्यांच्या असे लक्षात येऊ लागले कि समोर कोणतीहि व्यक्ती आली कि तिच्या जीवनाचा संपूर्ण चित्रपटच आपल्या डोळ्यासमोर उभा राहत आहे . पण त्याच्याने ते अस्वस्थ व्हायला लागले आणि भगवंताकडे त्यांनी प्रार्थना केली " हि पीडा माझ्यामागे नको लावूस .हे भगवंता तुझ्या भक्तीशिवाय मला दुसरे काहीही नको " अशी पार्थना केल्यानंतर हे सर्व प्रकार बंद झाले.
तुमची इच्छा असो वा नसो या सिद्धी एक प्रकारच्या तुमच्या उपासनेच्या उपलब्धता म्हणून येतच असतात . आज ना उद्या त्या तुम्हाला प्राप्त या होणारच. त्या साधकाला चिकटल्या नंतरच साधकाची खरी परीक्षा चालू होते. आदिमाया साधकाला यातच गुंतवून ठेवण्याचे काम करत असते. या सिद्धिंकडे तठस्थ वृत्तीने पाहता आले पाहिजे तरच मग पुढचा मार्ग सुरु होईल. अन्यथा साधक या सिद्धीतच रममाण होईल.
(या पुढचा भाग उद्या पाहू पुष्प ३ )
।।शुभम भवतु ।।

No comments:
Post a Comment