Friday, February 28, 2025

पुष्प १ - साधना / ध्यानधारणा ...अध्यात्मिक प्रगतीचा महामार्ग

 


। श्री गुरू शरणं ।।  पुष्प १ 

साधना  / ध्यानधारणा ...अध्यात्मिक प्रगतीचा महामार्ग

  (शक्यतो सर्वांना समजेल अशा भाषेत केलेले  विवेचन ....)

 "साधना" या शब्दाचा शब्दशः अर्थ 'एखादे ध्येय साध्य करण्यासाठी कृती' असा होतो. पण प्रत्यक्षात ती एक आध्यात्मिक साधना आहे व सातत्याने  भक्ती व श्रद्धेने करीत राहिल्यास भगवत चरणापर्यंत मार्गस्थ होता येते किंबहूना तीच साधनेची अंतिम फलश्रुती आहे .

खरेतर उपासना, योग, ध्यान, जप, उपवास आणि तपस्या या धार्मिक आणि आध्यात्मिक अनुशासनाच्या सरावाला साधना म्हणतात. 

 "साधना" म्हणजे तप. योगी योगविद्येची साधना करतो. ज्ञानवंतांचा मार्ग ज्ञानसाधनेचा. संगीतोपासक स्वरसाधना करतात, तर कर्मयोगी कर्ममार्गाचे आचरण करतात. आयुष्यभर एकेका क्षेत्राला वाहून घेतलेल्या व्यक्ती साधनाच करीत असतात.

💐इच्छित फल प्राप्ती साठी रोज साधना करावी लागते सातत्य हवे . शक्यतो वेळ ठिकाण व आसन ही तेच ठेवावे

 साधनेस सुरवात करण्यापूर्वी समस्त प्राचीन योग्यांना, स्वत:च्या गुरु देवांना आणि भगवंताना प्रणाम करून मग साधनेस प्रारंभ करावा. 

💐 जिथे अग्नी वा पाणी यापासून काही धोका आहे, अश्या जागी, वाळक्या पानांनी झाकलेल्या जमिनीवर, वारूळानी भरलेल्या जागी, जंगली जनावरे असलेल्या जागी, चौरस्त्यावर, जिथे फार आवाज होत असेल अश्या स्थानी, भयावह ठिकाणी, जिथे फार दुर्जन वसतात अश्या स्थळी योग साधना करू नये. हा दंडक साधकाला विशेषे करून लागू आहे.

💐साधना/ ध्यानाच्या बाबत काही गोष्टी साधकाने लक्षात ठेवाव्यात उदाहरणा दाखल सांगतात, सरळ बसावे व आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी लावावी. नासाग्री दृष्टी ठेवल्याने मन स्थिर एकाग्र होण्यास मदत होते असे आपणास आढळून येईल. 

💐 डोळ्याच्या दोन्ही नाड्यांवर ताबा मिळवू शकल्यास, प्रतीक्रियांच्या केंद्रावरदेखील बराच ताबा मिळू शकतो, आणि तद्दद्वारा ईच्छा शक्तीवर देखील आपला बराच ताबा चालू शकतो साधनेत असताना अशी कल्पना करावी कि तुमच्या मस्तकाच्या वरती एक पद्म आहे, धर्म त्याचा मध्य भाग आहे, ज्ञान त्याचे देठ आहे, योग्याच्या अष्टसिद्धी त्या पद्माच्या आठ पाकळ्या आहेत, आणि वैरागी त्याच्या आतील कोश आहे, आत मधील कोशाला परम वैरागी म्हणजे अष्टसिद्धीविषयी त्याग भावना मानण्यात आले आहे. त्या पद्माम्ध्ये तो हिरण्यमय, सर्व शक्तिमान पुरुष विराजमान आहे असे स्मरण करावे. 

“ओम” हे त्याचे नाव आहे. तो अनीवर्तनिय आहें, दैदिप्यमान प्रकाशाने वेढलेला आहें, त्यावर आपले मन  केंद्रित करा, एक दुसरे प्रकार म्हणजे असे चिंतन करावे कि, आपल्या हृदया मघ्ये एक पोकळी आहें. त्या पोकळी मध्ये एक ज्योत तेवत आहें, ज्योत स्वतचा आत्मा आहें असे चिंतन करावे ज्योतीमागे दैदीप्यमान प्रकाश विद्यमान असून तो म्हणजे परमात्मा स्वरूप ईश्वर होय.

💐 साधना ज्या साध्यासाठी करायची असते. त्या साध्यासाठी प्रयत्नशील राहाणं, हा साधकाचा धर्म आहे. हे आपल्याला आपल्या गुरूकडून शिकायला मिळते. यासाठी साधकास सातत्याने प्रयत्नशील राहावे लागते .यश हे पूर्णतया सातत्याने केलेल्या प्रयत्नांवर अवलंबून आहे .

💐 तसे पहिलेतर सद्‌गुरुंनी गुरुमंत्र दिल्यानंतर साधना ही आपणासच करायची असते. पण प्रत्यक्षात ही साधना सद्‌गुरूच आपल्याकडून करवून घेत असतात. गुरूमंत्राच्या उपदेशानंतर अनेक अनुभूती सद्‌गुरू देतात पण त्यासाठी साधकास  निरंतर प्रयत्नशील राहावे लागते .त्यामुळे साधनेत येणाऱ्या अडचणी हळूहळू दूर होतात. प्रत्येक गोष्टींत सद्‌गुरुंचा सहवास असल्याची अनुभूती येते. हे आपण करत नसून सद्‌गुरूच आपल्याकडून करवून घेत आहेत अशी अनुभूती येते. 

 पण मोहमायेमुळे आपण अंध झालेले असतो. हे आपल्या लक्षात येत नाही. यासाठी "अवधानाचा वाफसा" असणे आवश्‍यक आहे. तरच गुरूमंत्राची व त्यानंतर होत असलेल्या उपदेशाची पेरणी वाया जाणार नाही. 

 हे बीज वाया जाणार नाही ना? 

 अध्यात्मात प्रगती होईल ना? अशा अनेक शंका येत राहतात.  काळजी वाटते पण अशी काळजी करणे व्यर्थ आहे. कारण कर्तेकरवते हे सद्‌गुरूच आहेत. हे अनुभवाने आपल्या लक्षात येते. खरेतर आपल्या डोळ्यावरची ही झापड सद्‌गुरू दूर करतात आणि आपणा दृष्टी देतात.

खरेतर साधनेतही  अडथळे येत राहतात पण साधकाचा सद्गुरू वर ठाम विश्वास हवा  कि अनुग्रह झाला याचा अर्थ श्रीसद्गुरू माझे मालक आहेत. ते माझे मालक आहेत याचा अर्थ असा की, "मी त्यांचा आहे. माझ्यासकट माझे सगळे आता त्यांचे आहे." दैनंदिन जीवनात हा अर्थ कसा प्रकट व्हायला हवा ते पहा-*

*प्रपंचात जो जो प्रसंग येईल तो तो त्यांच्याच इच्छेने येणार. मी केलेल्या प्रयत्नांचे फळ त्यांच्याच इच्छेने मिळणार. माझे कल्याण व्हावे हीच त्यांची इच्छा असणार. म्हणून, प्रपंचातील प्रत्येक प्रसंगात --

१) माझ्या इच्छेपेक्षा "त्यांच्या" इच्छेला मनापासून मान द्यायचा.

२) त्यांच्या इच्छेने जे घडून येईल त्यात अत्यंत आनंदाने- आपलेपणाने, श्रद्धेने आणि धीराने शांत राहायचे.

*या दोन लक्षणांनी त्यांच्या मालकीची खरी जाणीव जीवनात उतरते.

  (पुढील भाग उद्या पाहू  पुष्प २ मध्ये )

  ।। शुभम भवतु ।।

No comments:

Post a Comment