Tuesday, November 4, 2025

वैकुंठ चतुर्दशीचे महत्व... शैव व वैष्णव शक्ती मिलन....आज वैकुंठ चतुर्दशी

 

वैकुंठ चतुर्दशीचे महत्व... शैव व वैष्णव शक्ती मिलन....आज वैकुंठ चतुर्दशी.



त्रिपुरारी पौर्णिमेचा आधिचा दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही चतुर्दशी 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते. चातुर्मासामध्ये विष्णू शेषावर झोपत असल्याने त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो, असे म्हणतात. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात. या दिवशी 'हरिहर भेट' म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते, असं मानलं जातं. या दिवशी चतुर्मासाची सांगता होते. या दिवशी रात्री शंकराची १००८ नावे घेऊन आणि विष्णूची सहस्र नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून पूजा केली जाते. विविध मंदिरांमध्ये तसेच अनेक कुटुंबांमध्येही ही पूजा केली जाते. महाराष्ट्राबरोबरच उज्जैन, वाराणसी या शहरांमधील मंदिरांतसुद्धा 'हरिहर' पूजा केली जाते

कार्तिक शुध्द चतुर्दशीस विष्णु आणि शंकर यांची मध्यरात्री आवळीच्या झाडाखाली भेट होते. यास हरीहर भेट असे ही म्हणतात. ब्रह्मदेवास दोन पत्नी आहेत, सावित्री आणि धात्री. त्यापैकी धात्री ही आवळीच्या झाडाच्या स्वरूपात पुजली जाते. 
वामन अवतारात बळीस पाताळात घातल्या नंतर बळीला दिलेल्या वराप्रमाणे श्रीविष्णु हे आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी ते प्रबोधिनी एकादशी या काळात देव पाताळात बळी कडे असतात. त्यामुळे या काळात असुरी शक्तींचा प्रादुर्भाव जास्त असतो, व त्याचा त्रास मनुष्यास होऊ नये म्हणुन व्रतवैकल्ये केली जातात. या काळात विष्णु आपली पालन पोषणाची जबाबदारी शंकरांकडे सोपवितात. वैकुंठ चतुर्दशीस शंकर ही जबाबदारी परत विष्णुकडे देऊन आपण तप करण्यास निघुन जातात , ती भेट म्हणजेच हरीहर भेट. काही ठिकाणी असे ही मानले जाते की, मोहिनीरुप धारण केल्यानंतर विष्णुंनी मोहिनीरुप त्यागून शंकराची जी भेट घेतली ती हरीहर भेट. 
वैकुंठ चतुर्दशी ही अतिशय शुभ आणि पुण्यप्रद आहे. या दिवशी मध्यरात्री श्रीविष्णुना बेल व शंकरास तुळस अर्पण केली जाते. तसेच आजच्या दिवशी वृन्दा म्हणजे तुळस आणि शाळीग्राम यांचेही पुजन केले जाते. आज पार्वती देवीस जव या धान्याची भाकरी करुन नैवेद्य दाखविला जातो, त्यामुळे किडणीशी संबधित सर्व विकार नष्ट होतात. 
एकुणच वैकुंठ चतुर्दशीस विष्णु आणि महादेव यांच्या पुजनाने भक्तास वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. विष्णुना एकसहस्र कमळ अर्पण करण्याचीही पध्दत आहे.
आजच्याच दिवशी पितरांच्या मुक्तीसाठी क्षेत्राच्या ठिकाणी तर्पण देण्याचीही प्रथा आहे, कारण महाभारतात मृत्युमुखी पडलेल्या वीरांच्या मुक्तीसाठी भगवान कृष्णाने आजच्याच दिवशी श्राध्द करुन तर्पण दिले होते.
आज उज्जैन व काशी येथे हरीहर भेटीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो.
थोडक्यात, आज वैष्णवी व शिव शक्ती एकाकार होतात. 
याचाच अर्थ विष्णु शिव ही रूपे दोन आहेत, पण शक्ती एकच आहे, या एकाकार शक्तीचा उत्सव आपण साजरा करतो. परंतु आपल्या समाज रचनेत अजुनही विष्णु मोठे की शंकर मोठे यावरुन मतभेद, वाद , संघर्ष देखील होतात. परंतु, जेथे ईश्वरी शक्तीनेच स्वतः मध्ये भेद केला नाही, त्याचा भेद करणारे आम्ही कोण? परंतु अज्ञानी मनुष्यास हे कळत नाही. 
ईश्वरी शक्ती ही अभेद्य, निर्गुण, निराकार असुन ईश्वरी लीला करण्यासाठी त्या शक्तीने अनंत रुपे धारण केली आहेत. आज वैकुंठ चतुर्दशीच्या पुण्यप्रद मुहूर्तावर त्या एकाकार महाशक्तीस आपण शरण जाऊया व त्या शक्तीस साष्टांग दंडवत घालुया

वैकुंठ चतुर्दशी कथा आणि महत्त्व -
पौराणिक कथेनुसार, एकदा भगवान विष्णु यांनी काशी येथे महादेवाला एक हजार कमळ वाहण्याचा संकल्प केला होता. यावेळी महादेवाने विष्णुची परिक्षा घेण्यासाठी या कमळातून एक कमळ कमी केले. यावर भगवान विष्णु यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला. विष्णुची ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णुला वर दिला की, कार्तिक मासनंतर येणारी चतुर्दशी 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून ओळखली जाईल. जो कोणी हे व्रत करील त्याला वैकुंठ प्राप्ती होईल.

या दिवशी भगवान विष्णुची पुजा केली जाते. विष्णुला चंदन, फुलं, दुध, दही या सर्वांनी अंघोळ घातली जाते आणि भगवान विष्णुचा अभिषेक केला जातो. या दिवशी विष्णु नामस्मरण केलं जातं. विष्णुला गोड नैवद्य दाखवला जातो आणि त्यानंतर उपवास सोडला जातो. तसेच या दिवशी विष्णुंसह शिवाची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. असे सांगितले जाते.

महाभारत काळात श्रीकृष्णाने युद्धात ज्यांचा मृत्यू झाला होता त्यांचे श्राद्ध वैकुंठ चतुदर्शीला केले होते. म्हणूनच या दिवशी तर्पण आणि श्राध्द करणे श्रेष्ठ असल्याचे मानले जातं. सद्धगुणी, दिव्य पुरुष आणि सतकर्म करणार्‍यांना वैकुंठ प्राप्ती होते. तरी श्रद्धापूर्वक वैकुंठ चतुर्दशी केल्यास वैकुंठात स्थान मिळण्याची शक्यता वाढते.

पुराणानुसार या दिवशी शिवाने प्रभू विष्णुंना सुदर्शन चक्र दिले होते. या दिवशी शिव-विष्णु एकाएक रुपात असतात.

असे म्हणतात, की या तिथीला ब्रह्ममुहूर्तावर भगवान महाविष्णूंनी वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर स्नान केले होते आणि भगवान शंकरांची प्रार्थना केली होती. त्या पूजेने भोलेनाथ एवढे प्रसन्न झाले, की त्यांनी प्रत्यक्ष हरीची भेट घेतली आणि प्रसन्न होऊन वर दिला, की यादिवशी जे विष्णू भक्त किंवा शिव भक्त मनोभावे भगवंताची आळवणी करतील, त्यांना वैकुंठप्राप्त होईल.

मृत्यूनंतर नरकात जावे, असे कोणाला वाटेल? आयुष्यभर हालअपेष्टा सहन केल्यानंतर मृत्यूपश्चात तरी आत्म्याला सद्गती मिळावी, असे प्रत्येकाला वाटते. ती वाट सुकर व्हावी, म्हणून आपण आयुष्यभर चांगले आचरण करतो आणि त्याला आध्यात्मिक जोड मिळावी, म्हणून व्रत-वैकल्य करतो. वैकुंठ चतुर्दशीचे व्रत ही त्यापैकीच एक!
वैकुंठ चतुर्दशीलाच काशी विश्वनाथ स्थापना दिवस असेही म्हणतात. यादिवशी भगवान विष्णू आणि महादेव यांची प्रार्थना केली जाते व षोडशोपचार पूजा करून स्तोत्रपठण केले जाते.

आषाढी एकादशीला भगवान महाविष्णू झोपतात, ते थेट कार्तिकी एकादशीला उठतात, असे म्हटले जाते. विष्णूंच्या अनुपस्थितीत त्यांची वैश्विक जबाबदारी भगवान शंकर सांभाळतात. याबद्दल कृतज्ञता म्हणून विष्णू महादेवाला फळे, फुले आणि बेल वाहतात, तर महादेवदेखील विष्णूंना प्रिय असलेली तुळशी वाहून जागे करतात. हे हरी हर ऐक्य, प्रेम, सद्भावना, एकमेकांप्रती आदर या भेटीतून दिसून येतो. तो आदर्श आपणही डोळ्यासमोर ठेवून आपण दोहोंची उपासना करावी, हा वैकुंठ चर्तुदशी मागील हेतू आहे.

वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरी-हर स्तोत्र म्हणतात. अन्यथा विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात. इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो, परंतु या भेटीचे आगळे वेगळे महत्त्व म्हणून अशी पूजा केली जाते.

देवाधिदेव महादेवांना प्रसन्न केले असता, आपसुक माता पार्वतीदेखील प्रसन्न होते आणि भगवान विष्णूंचे ध्यान केले असता, त्यांच्यासह लक्ष्मी मातेचीही कृपादृष्टी लाभते. त्यामुळे घरातील दु:ख, दारिद्रय नाहीसे होऊन, आयुष्यातील नरक यातना मिटतात आणि जिवंतपणीच वैकुंठप्राप्तीचा आनंद अनुभवता येतो.

स्वर्ग म्हणजे तरी नेमके काय, स्व म्हणजे स्वत: आणि ग म्हणजे सभोवतालचा परिसर. आपण निर्माण केलेले विश्व आणि आपल्या विश्वातील आनंददायी क्षण म्हणजे स्वर्ग. तसेच नरक म्हणजे नराने निर्माण केलेला, तो नरक! वाईट गोष्टी पेरल्या तर फळही वाईटच येते. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले परंतु मानवाने आपल्या हातांनी बरेच काही गमावले. त्यामुळे जी स्थिती निर्माण झाली, तो नरक!

*मनुष्यासमोर चांगला आदर्श, चांगले विचार, चांगले आचार असले, की तो ठरवूनही मनात वाईट विचार आणू शकत नाही. यासाठीच चांगल्या कथा-कहाण्यांचे पारायण केले जाते. त्यातून प्रेरणा घेतली जाते.  विष्णूंचे विश्रांती काळात शिव सर्व विश्वाची जबाबदारी घेतात ....एकमेका साहाय्य करू ...........आहे ना कौतुकास्पद?

हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही वैकुंठ चतुर्दशी साजरी करूया....शुभम भवतु .

No comments:

Post a Comment