Monday, August 25, 2025

गणेशोत्सव विशेष. - सार्वजनिक गणेशोत्सव इतिहास --पुष्प ८

 

।। ओम गं गणपतये नमः ।।
 गणेशोत्सव    पुष्प   

सार्वजनिक  गणेशोत्सव इतिहास --

💐💐गणेशोत्सवाचे जनक समर्थ रामदास स्वामीं ....
 
समर्थांनी दासबोध आणि मनाचे श्लोक याची सुरवात गणपतीला वंदून केली आहे.
 
ॐ नमोजि गणनायेका । सर्व सिद्धिफळदायेका । अज्ञानभ्रांतिछेदका । बोधरूपा ॥
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा । मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥
 
गिरीधरस्वामींच्या समर्थ प्रताप ग्रंथा मध्ये व समर्थ आणि समर्थसंप्रदाय ग्रंथामध्ये पान क्रमांक 106 वर गणेशोत्सवाचे आयोजन केल्याचे वर्णन खालील ओवी मध्ये सांगितले आहे.
 
'समर्थे सुंदरमठी गणपती केला । दोनी पुरूषे सिंदूरवर्ण अर्चिला ।
सकळ प्रांतासी मोहोछव दाविला । भाद्रपद माघपर्यंत ।
शिवराजासी अकरा मुष्ठी भिक्षा मागो धाडीली ।
शिवराज म्हणे माझी परिक्षा समर्थे मांडीली ।
अकरा अकरी (एकवीसाशे-121) खंडया कोठी पाठविली ।
हनुमान स्वामीमुष्ठी लक्षुनिया ॥
 
वरील ओवील मध्ये तर स्पष्ट दिसून येत की समर्थांनी सुंदर मठात म्हणजेच आनंदवन भुवनी पहिल्या सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरवात केली. भाद्रपत महिन्या पासून ते माघ महिन्या पर्यंतर थोडक्यात सांगायचं झाल तर जगातील हा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव जवळपास पाच महिने सुरु होता.
 
आरंभीं वंदीन विघ्नविनायक । जया ब्रम्हादिक वंदितील ॥
वंदितील संत कवि ऋषि मुनि । मग त्रिभुवनीं कार्यसिद्धी ॥
 
समर्थ गाथा १५९८ ओवी मध्ये तर याच वर्णन समर्थनही अचूक केला आहे
गणपति पाहूणे आले । सिद्धलाडूसी मोद्क केले । तूपासाखरेनें घोळले रे रे । भक्त जेवितां धाले रे ॥१॥
 
समर्थांच्या आनंदवनभुवनी कवितेतील ८ ओवी वाचल्यावर तुम्हाला नक्कीच कळेल.
हे साक्ष देखिले दृष्टी । किती कल्लोळ ऊठिले । विघ्नघ्ना प्रार्थिले गेलो । आनंदवनभुवनी ॥8॥
 
गणेशोत्सव कशासाठी आयोजित करण्यात आला असावा याचे वर्णन समर्थांनी ' सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची 'या त्यांच्या जगप्रसिद्ध आरतीमध्ये केल्याचे दिसून येते. या ओवीची रचना समर्थांनी १६५८  मध्ये केली आहे.
 
थोडक्यात इतिहास पहायचा झाला तर विजापूरचा सरदार अफझलखान हिंदवी स्वराज्यावर चाल करून आल्याचे शिवथरघळीतील आनंदवनभुवनामध्ये समर्थांना समजून आले.
 
'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची...' या आरतीद्वारे समर्थांनी 'संकटी पावावे। निर्वाणी रक्षावे।'
असा म्हणजेच आमच्या शिवाजी राजेंना या संकटामध्ये पाव आणि त्यांचे निर्वाणापासून रक्षण कर, असा नवस समर्थांनी गणपतीला केला आहे.
 
वंदूनियां मंगळनिधी । कार्य करितां सर्वसिद्धी । आघात अडथाळे उपाधी । बाधूं सकेना ॥
 
सन १६५९ साली अफझलखान प्रतापगडाच्या पायथ्याशी मारला गेला आणि छत्रपतींना निर्वाणीपासून रक्षिणाऱ्या गणपती नवस फेडण्यासाठी समर्थांनी शिवरायांकडे अकरा मुष्ठी भिक्षा मागितली. शिवरायांनी दिलेले १२१ खंडी धान्य भाद्रपद चतुर्थी ते माघ चतुर्थीपर्यंत सरासरी दररोज ६७५ किलो दिवसाला महाप्रसादासाठी लागल्यास सुमारे पाच महिने चाललेल्या या महाराष्ट्रातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवास दररोज ११००० हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेण्यास उपस्थित राहिले असावेत. खालील ओवी नक्कीच त्याची प्रचीती देत असावी.
 
'आक्रा आक्रा बहु आक्रा। काय आक्रा कळेचिना। गुप्त ते गुप्त जाणावे। आनंदवनभुवनी॥
 
त्यामुळेच समर्थांचा हा महाराष्ट्रातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सव कोकणासह देशात सर्वदूर पसरला आणि समर्थ रचित गणपतीची आरती 'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची यामुळे म्हण्याची सुरवात झाली आणि ते आजतागायत सर्वच गणेशोत्सवामध्ये म्हणण्याचा प्रघात सुरू आहे.
 
“ दास रामाचा वाट पाहे सदना ” ही ओवी तर आज प्रत्येकाला नकीच माहित असेल कारण गणपती विसर्जना पासून ते पुढचा वर्षीचा गणपती उस्तव चालू होई पर्यंतर सर्वजण त्या गणपती बाप्पाची आतुरतेने वाट पाहत असतात.
 
थोडक्यात सांगायचे झाले तर समर्थांनी तेंव्हा चालू केलेला हा सार्वजनिक गणेश उत्सव आज पण असाच चालू आहे आणि पुढे पण चालू राहील आणि त्याची प्रचीती पुढील ओवी मध्ये आपणाला ते नक्कीच दिसून येईल.
 
गणाधीश माझें कुळींचे दैवत । सर्व मनोरथ पूर्ण करी ॥
पूर्ण करी ज्ञान तेणें समाधान । आत्मनिवेदन रामदासीं ॥

💐💐  आपण जरा महाभारतकालीन गणपती अवतार पाहूया
 
गणेशाने सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुगात अवतार घेतल्याचे सांगितले जाते. गणेशाने सत्ययुगात कश्यप आणि अदितीकडे महोत्कट विनायकाच्या अवतार धारण केला. या युगात गणपतीने देवतान्तक आणि नरान्तक नावाच्या राक्षसांचा वध करून धर्माची स्थापना केली आणि आपल्या अवतारकार्याची सांगता केली. गणेश त्रेता युगात मोरावर आरूढ होऊन प्रगट झाले. तर, द्वापारयुगात गणेश उंदीरावर बसून प्रगट झाले. गणेशाला पौराणिक पत्रकार किंवा लेखक असेही संबोधले जाते. कारण याच युगातील अवतारात त्यांनी महाभारत लिहिले होते, असे सांगितले जाते.
 
पेशवे आणि घरगुती गणेशोत्सव
 
सवाई माधवरावांनी घरगुती गणेश पूजनाला उत्सवाचे मोठे रूप दिले. हा उत्सव भव्य स्वरूपात शनिवारवाड्यातील गणेश महालात भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून ते दशमीपर्यंत साजरा केला जाऊ लागला. दरबारातील अन्य मानकऱ्यांनीसुद्धा या कल्पनेचे स्वागत केले. शनिवारवाड्यातून फुला-पानांनी सजवलेल्या पालखीतून गणेशमूर्तीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येऊ लागली. शनिवारवाड्याजवळच उत्तरेच्या दिशेला असणाऱ्या नदीप्रवाहात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येऊ लागले. सुरुवातीला दीड दिवस, पाच दिवस, दहा दिवस असा उत्सव होता. आजच्या काळातही ही वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते. लोकमान्य टिळकांच्या देशकार्यात गणपतीला देशा-परदेशात महत्त्व प्राप्त झाले. लोकमान्यांनी जनसामान्यांची एकत्रीकरण स्वातंत्र्या विषयी जन जागृती निर्माण करण्यासाठी गणेशोत्सवाचा फार प्रभावी उपयोग केला .  

आजचे हे पुष्प श्री गजाननाचे चरणी समर्पित.
हिंदुस्तान विश्वगुरु हो हीच  गणरायाचे चरणी प्रार्थना ।
 

No comments:

Post a Comment