Sunday, November 23, 2025

उद्धरी गुरुराया .....श्री दत्तजयंती. पुष्प २

उद्धरी गुरुराया .....श्री दत्तजयंती. पुष्प २



ज्याच्या मनी श्री सदगुरू विचार।।
तो नसे कधी लाचार।।
ज्याच्या अंगी श्री सदगुरू भक्ती।।
त्याला नाही कशाची भिती।।
ज्याच्या हृदयात श्री सदगुरू मुर्ती।।
त्याची होई जगभरात किर्ती।।
जो करेल श्री सदगुरूची पुजा।।
त्याच्या आयुष्यातुन संकटे होती वजा।
 
सदगुरुराजांच्या मुद्रेवरुन  त्यांचा अभिप्राय काय आहे  हे समजले पाहिजे ,इतकी सदगुरुरायांचशी तन्मयता साधली पाहिजे.आपल्या सदगुरुराजांचे  मन जाणून त्याप्रमाणे  वागणारा उत्तम शिष्य होऊ शकतो.

शामल नयनी प्रेमळ दृष्टी 
 सदा कृपेची करी वृष्टी
 भक्तजनांच्या पाठीवरती,
 फिरवी कोमल हात,
 स्मरा हो दत्तगुरु दिनरात !!
               
देहाचा सतत सदुपयोग हेच परमार्थाचे सर्वश्रेष्ठ साधन आहे.मनुष्यजन्माची सार्थकता मनुष्य देहाकडुन सत्कर्म, सदाचार, सदुपयोग ,सद्वर्तन होण्यानेच होते.

दत्तावताराची प्रमुख वैशिष्ट्ये

१) साधुंचे संरक्षण, दुर्जनांचे निर्दालन व धर्मसंस्थापनेसाठी सध्दमाचे आचरण हे दत्तावताराचे प्रमुख वैशिष्ठ होय! इतर अवतारांप्रमाणे हेतू सफल होताच निजधामास जाणारा हा अवतार नसून तो जगाच्या अंतापर्यँत असाच चालू राहणार आहे.
२) ब्रम्हदेवाचा पुत्र अत्रि व त्याच्या कठोर तपश्र्चर्येचे फळ म्हणून दत्ताचा अवतार झाला आणि म्हणूनच तो अयोनीसंभव मानला जातो.
३) या अवतारात ब्रम्हा, विष्णू व महेश या तीन प्रमुख देवांचे व त्यांच्या परंपराचे ऐक्य आहे. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय यासाठी प्रसिध्द असलेल्या या तीन देवांचे एकरुपत्व म्हणजे हा दत्तप्रभूंचा अवतार होय.
४) दत्तावतार हा ब्राम्हण कुलातील असून सती अनसूयेच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने या अवतारास महत्व आहे.

श्री दत्तगुरूंचे  भ्रमण

५) राम, कृष्ण इ.अवतार हे गृहस्थाश्रमी होते तर दत्तावतार हा फारच अल्पकाळ गृहस्थाश्रमात राहून नंतर अवधूत अवस्थेतच भ्रमण करणारा आहे.
६) हा अवतार म्हणजे साक्षात परब्रम्हमूर्ती श्रीसद्गुरुंचाच अवतार होय आणि म्हणूनच साधक "श्री गुरुदेव दत्त"असायांच्या नावाचा जयघोष करतात.
७) श्रीदत्त हे केवळ गुरुदेव नसून ते "अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त"या स्वरुपात आहेत।
८) श्री दत्तात्रेयांनी आपल्या भक्तांना विविध वेषात व स्वरुपात म्हणजेच अवधूत, फकीर, मलंग, वाघ इ. दर्शने दिली आहेत.
९) दत्तावतार हा प्रामुख्याने वर्णाश्रम पध्दतीचा पुरस्कार करणारा असला तरी इतर जाती जमातींना त्याच्या उपासनेस कोणताच प्रतिबंध नाही.
१०) दत्त व दत्त संप्रदायाचा नाथ, महानुभाव, वारकरी, रामदासी इ. उपासना पंथांशी घनिष्ट संबंध आहे. उदा. गोरक्षनाथ हे दत्तात्रेयांचे शिष्य, महानुभाव पंथात एकमुखी दत्ताची पुजा होते. समर्थ रामदासांना श्री दत्तात्रेयांचे साक्षात दर्शन झाले होते आणि विशेष म्हणजे स्वत: दत्तात्रेय हे निस्सिम देवीभक्त होते.
११) औदुंबरतळी वस्ती,जवळ धेनु व श्र्वानाचे सान्निध्य हे दत्तावताराचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य.
१२) "त्रिमुखी" किंवा "एकमुखी" दत्तात्रेयांच्या मूर्तीप्रमाणेच "दत्तपादुका"ची ही पूजाअर्चा अनेक दत्तस्थानांवर केली जाते.
१३) "गुरुवार" हा दत्तांचा वार. याच दिवशी घराघरांतून व दत्तस्थानांतून दत्तात्रेयांचे भजन-पूजन भक्तिभावाने केले जाते. मार्गशीर्ष प्रौर्णिमा ही "दत्तजयंती" म्हणून महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.
१४) श्री दत्तात्रेयांचे १६ प्रमुख अवतार आहेत.
१५) श्रीदत्त उपासनेत योगाला अनन्य साधारण महत्व आहे. शाक्त व तांत्रिकांनीही श्री दत्तात्रेयांना आपले आराध्य दैवत मानले आहे.
१६) श्री दत्तात्रेय हे शरणगत वत्सल व भक्तांवर अनुकंपा व दया करणारे आहेत आणि म्हणूनच नुसत्या स्मरणानेच ते भक्ताची आर्त हाक ऐकून धाऊन येतात.
१७) धर्म व अध्यात्मात व्यापक व उदार दृष्टीकोन हा दत्तावताराचा आणखी एक विशेष एक विशेष आहे.
१८) दत्त संप्रदायाचेचतत्वज्ञान उदात्त, दिव्य, भव्य, निर्मळ व सोलीव अव्दैत स्वरुप आहे.
१९) भूत-प्रेत-पिशाच्चे दत्तात्रेयांच्या वाऱ्यालाही उभी राहात नाहीत.
२०) दत्तात्रेयांच्या व्यापक व उतार दृष्टीमुळे ही उपासना प्रणाली किंवा संप्रदाय कल्पान्तापर्यँत खचितच पथप्रदर्शन करीत राहील.
२१) जोपर्यँत जगामध्ये मानव हा तापत्रयांनी त्रस्त व पीडित असा राहील तोपर्यँत दत्तात्रेय अज्ञानान्धकारात त्यास सदैव मा र्गदर्शन करीतच राहतील.

श्री दत्तात्रय नावाची सार्थकता

अनसूयात्रिनंदन ‘दत्त’ नावाची सार्थकता निवेदन करताना श्रीमत् भागवतकार सांगतात,

अन्नेरपत्यमभिकांक्षत आह तुष्टो । दत्तो मयाऽमिति यद् भगवान स दत्त: ॥

अर्थात (स्वत: श्री भगवान विष्णु सांगतात) मीच स्वत:ला दिले, अत्रिऋषींच्या पुत्राकांक्षेच्या तपस्येवर मी संतुष्ट झालो आहे, मी प्रकट होऊन अत्रिऋषींची अपत्याकांक्षा पूर्ण केली, मीच मला दिले व अशाप्रकारे दिलेला म्हणून ‘दत्त’ नाव सार्थक झाले. 

१) भारत राष्ट्राचा मध्ययुगीन काळखंड चौदावे शतक. या काळखंडात भगवान श्री दत्तात्रेयांचा प्रथमावतार श्रीपाद श्रीवल्लभ आणि द्वितीयावतार भगवान श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज या दोन्ही युगप्रवर्तक महानुभावानी महाराष्ट्र तथा कर्नाटक प्रांतांत दत्तोपासनेचा प्रसार-प्रचार केला. 

२) त्यापूर्वी म्हणजे बाराव्या शतकात महानुभाव संप्रदायाचा आविर्भाव झाला. हा संप्रदाय केवळ दत्तप्रणितच नव्हे तर या संप्रदायाचे आदिगुरूसुद्धा भगवान श्रीदत्तात्रेय हेच आहेत. 

३) महानुभाव संप्रदायापूर्वी अनेक शतकांच्या आधी नाथसंप्रदाय निर्माण झाला. हा संप्रदाय भगवान श्रीदत्तात्रेयांनाच आदिगुरू मानतो. 
दत्तावताराची औपनिषदिक पृष्ठभूमीवर भगवान श्रीदत्तात्रेयांच्या प्राचीनतेला औपनिषदिक ग्रंथसुद्धा प्रमाणभूत आहेत.

हे प्रभु दत्तात्रया भगवन,
माझ्या पायात एवढं बळ दे की धावत धावत मी तुझ्या दारात येऊ शकेल.
मला अशी बुद्धी दे की रोज सकाळ - सायंकाळ मी गुडघे टेकून विनम्रपणे प्रणाम करू शकेल.
मी १०० वर्षे जगावे किंवा ५०, ही तुझी इच्छा !
माझी तर एकच इच्छा आहे की, जोपर्यंत कंठात प्राण आहे तोपर्यंत मुखात तुझेच नाव असावे.
दानासाठी माझे हात कधीच थकु नयेत.
हे भक्तवत्सला दयासागरा,
मला प्रेमळ दृष्टी दे, श्रध्देने झुकणारे मस्तक दे
सहकार्य करणारे हात दे, सन्मार्गावर चालणारे पाय दे
आणि सदैव तुझे स्मरण करणारे मन दे.
हे प्रभो
आपल्या लेकराला आपली कृपादृष्टी आणि सद्बुद्धी दे

।। श्री गुरू शरणं ।।

No comments:

Post a Comment