Friday, September 5, 2025

श्रीपाद श्रीवलभ जन्मस्थान पिठापुर

श्रीपाद  श्रीवलभ जन्मस्थान पिठापुर

श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्तप्रभूच आहेत. त्यांनी पिठापुर क्षेत्री या कलियुगात त्यांनी अवतार घेतला आहे. . आपल्या भक्तीभावास अनुसरून त्यांचे वर्तन असते. श्रीपाद श्रीवल्लभांना सद्गुरु या रूपाने स्मरण केल्यास सद्गुरुसारखेच अनुभव येतात. परमात्मा या रूपाने स्मरण केल्यास, तेच परमात्मा आहेत असे सिध्द करतात."

 आता आपण श्री क्षेत्र पीठापूर- श्रीपादांचे जन्मस्थान याबाबत  माहिती घेऊया ...

 पिठापूर-(पूर्व गोदावरी जिल्हा) आंध्रप्रदेश (PITHAPUR)-

हे क्षेत्र श्री दत्तात्रेयांचा मनुष्यरूपी पहिला अवतार असलेले श्री श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मगाव आहे. या क्षेत्रास पादगया असे  सुध्दा म्हणतात. आंध्रप्रदेशमधे पूर्व गोदावरी जिल्ह्यात काकिनाड्याजवळ हे क्षेत्र आहे. आपस्तंब शाखेतीलआपलराज, आणि सुमती माता या ब्राह्मणदांपत्यांच्या उदरी श्रीपादांचा जन्म झाला. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी श्राध्दकर्मासाठी आलेल्या ब्राह्मणांच्या भोजनाच्या अगोदर सुमती मातेने दत्तात्रेयांना भिक्षा वाढली. त्यामुळे संतुष्ट होऊन श्री दत्तात्रेयांनी मी तुझ्या उदरी जन्म घेईल असा आशिर्वाद सुमती मातेस दिला.  हे क्षेत्र अत्यंत पवित्र व रमणीय आहे दत्तभक्तांनी येथे जाऊन श्रीपाद वल्लभांचे दर्शन जरूर घ्यावे. 

हैद्राबाद, विशाखापट्टनम या मार्गावर सामलकोट हे रेल्वे स्टेशन लागते. तिथे उतरून रिक्षा अथवा बसने (१० किमी) अंतरावर असलेल्या पिठापूर या क्षेत्राला जाता येते. या ठिकाणी जाण्यासाठी सिकंदराबाद रेल्वे स्थानकांवरून नियमीत रेल्वेआहेत. शिर्डी, विशाखापट्टनम, काकिनाडा एक्सप्रेसया रेल्वे गाडया मराठवाडयातून पिठापूरला जाण्यासाठी सोईस्कर आहेत. पुण्या-मुंबईच्या लोकांसाठी मुंबई-भुवनेश्वर (कोणार्क एक्सप्रेस), तर विदर्भातील लोकांसाठी दक्षिण किंवा ओखा-पुरी एक्सप्रेस ह्या रेल्वे गाडया सोयीच्या आहेत. या ठिकाणी राहण्यासाठी भक्त-निवास असून दुपारी १२ वाजता आणि रात्री ८ वाजता महाप्रसादाची व्यवस्था आहे. पिठापूरला जाणारया भक्तांनी १५ दिवस अगोदर आपली पिठापूरला जाण्याची तारिख संस्थानला फोन करून कळवावी. जेणेकरून तिथे गेल्यावर रूम मिळ्ण्यास अडचण निर्माण होणार नाही.

श्री क्षेत्र पीठापूर- श्रीपादांचे जन्मस्थान  असलेल्या ठिकाणी अनेक प्रासादिक स्थळे आहेत ,भक्तगणांनी या

पीठापूर परिसरातील या स्थानी अवश्य दर्शन घ्यावे

१) कुंतीमाधव मंदिर : पूर्वजन्मीचा ब्राह्मण असलेल्या राक्षसाचा वध इंद्राने केला. त्याचे प्रायश्चित्ता दाखल ब्रह्मदेवाने पाच माधव मंदिर बांधण्यास सांगितले. संपूर्ण भारत देशात 

  • काशी येथे बिंदू-माधव, 
  • प्रयाग येथे वेणी-माधव, 
  • रामेश्वर येथे सेतू-माधव, 
  • त्रिवेंद्रम येथे सुंदर-माधव, व 
  • पीठापूर येथे कुंती-माधव मंदिर आहे. त्यास दक्षिण काशी असेही म्हणतात.

 ) श्रीदत्त अनघालक्ष्मी मंदिर

पीठापूर शहरापासून ३किमी अंतरावर श्रीदत्त अनघालक्ष्मी मंदिर आहे. हे मंदिर भव्य व सुंदर असून या ठिकाणी परवानगी घेऊन नामस्मरण करता येते. भाविकांना अनघाष्टमीचे व्रत व पूजा करता येते. सकाळी व दुपारी पूजा होते.

 ३) अंतरवेदी मंदिर

पीठापूर पासून ८० कि. मी. अंतरावर वसिष्ठ नदीजवळ श्री लक्ष्मी नृसिंह स्वामी यांचे १५ व्या शतकातील प्राचीन कालीन मंदिर आहे. तेथे ब्रह्मा - विष्णू - महेश स्वरुपात त्रिमूर्ती आहेत.

 ४) बिकोवोल मंदिर

काकीनाडा पासून ३५ कि. मी. अंतरावर भगवान शंकरांचे ९ व्या शतकातील प्राचीन मंदिर आहे.

 ५) द्राक्षारामम मंदिर

काकीनाडा पासुन २५ कि. मी. अंतरावर भिमेश्वरा स्वामी मंदिर आहे. हे प्राचीन कालीन मंदिर १० व्या शतकातील आहे. तसेच तेथे 'मणिक्यंबा' हे एक प्रसिद्ध देवीचे मंदिर आहे. (शक्तीपीठ)

 ६) गोदावरी पुष्करम (राजमुंद्री)

राजमुंद्री जवळ पुष्कराम तिर्थ आहे. गोदावरी पुष्करम १२ वर्षामध्ये एकदा येथच असतो. राजमुंद्री येथे बरीच वर्षे श्री मार्कण्डेय ऋषींचा वास होता. त्यांनी ग्रंथाचे लेखन येथेच केले. तेथे भव्य मार्कण्डेय मंदिर आहे. तेथे अर्ध कुंभमेळा भरतो. गोदावरी नदीमध्ये स्नानास तेथे महत्व आहे. तसेच गोदावरी नदी पार करुन दुसर्‍या बाजूस " कोटीलिंगेश्वर" हे १० व्या शतकामध्ये बांधलेले प्राचीन कालीन मंदिर आहे.

 ७) मंदापल्ली

राजमुंद्री येथून २८ कि. मी. अंतरावर व काकीनाडा येथून ४० कि. मी. अंतरावर भगवान शंकराचे मंदिर आहे. त्या मंदिरास "मंडेश्वर स्वामी" मंदिर असे म्हणतात. तेथे 'तेलाभिषेक' होतो.

 ८) रयाली 

राजमुंद्री पासुन ३५ कि. मी. अंतरावर असलेले व वशिष्ठ व गौतमी नदीच्या मध्ये वसलेले हे " जगम मोहिनी केशव स्वामी मंदिर" आहे. तेथे भगवान विष्णू व मोहिनी यांची काळ्या दगडा मधील प्राचीन मूर्ती असून ते एक महत्त्वाचे क्षेत्र आहे.

 ९)  क्षेत्र अन्नावरम

पीठापूर येथून ३२ कि. मी. अंतरावर असलेले " श्री सत्यनारायण मंदिर".

 श्री क्षेत्र अन्नावरम येथे "श्री वीरा व्यंकटा सत्यनारायण स्वामी" यांचे मुख्य मंदिर आहे. हे मंदिर डोंगरावर वसलेले आहे. या डोंगराला  "रत्नागिरी डोंगर" असे म्हणतात. जवळच श्रीराम, वनदुर्गा व कनकदुर्गा यांचीही मंदिरे आहेत. मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे व पूर्ण व्यवस्था आहे. चेन्नई - हावडा रेल्वे लाईनवर अन्नावरम आहे. रेल्वे स्टेशनपासून अन्नावरम मंदिर ३ कि. मी. अंतरावर आहे. हे एक अत्यंत महत्त्वाचे व जगप्रसिद्ध मंदिर मानले जाते. मंदीर दुमजली असुन तळमजल्यावर  "त्रिपाद विभूती नारायण" यंत्र असून वरच्या मजल्यावर देवांच्या मूर्ती आहेत. हे  "त्रिपाद विभूती नारायण उपनिषद" यंत्र अथर्ववेदांमधील एक भाग  आहे. पिठापुर स्थान महात्म्य अपरिमित आहे

 श्रीपाद श्रीवल्लभांचे निवासस्थान अत्यंत पवित्र व शांत आहे. येथे अभिषेक, दत्तहोम करुन आपणास सेवा अर्पण करता येते. सायंकाळी ७ वाजता पालखी सेवा असते. स्नान करुन सोवळे घालून आपणास पादूकांच्या पालखीत प्रत्यक्ष सहभागी होता येते. स्थान अत्यंत प्रसन्न व पवित्र आहे. मंदिरातून सोडून जाताना डोळे अक्षरश: पाणावतात. व श्रीपादांना पुन्हा येण्याचे आश्र्वासन देऊनच भक्त या स्थानाचा निरोप घेतात.

 ➨ श्रीपाद श्रीवल्लभांनी सर्व बालपणाचा काळ येथेच व्यतीत केला.

 ➨ कुक्कुटेश्वर कालाग्नीशमन दत्त, पादगया ही ठिकाणे येथील जागृत ठिकाणे आहेत.

 ➨श्रीपाद श्रीवल्लभांचे सर्व चमत्कार व लीला याच ठिकाणी घडल्या.

 ➨ श्रीपाद श्रीवल्लभ येथेच औदुंबर वृक्षाखाली विश्रांती घेत असत. त्यांच्याच आज्ञेनुसार पादुका व श्रींच्या मूर्तीची त्याच जागी स्थापना झाली.

 ➨  श्रीपाद श्रीवल्लभांचे अभिवचन आहे की माझ्या ईच्छेनेच भक्त पिठापूरी येऊ शकतील, पण जे येतील त्यांची सर्व कार्ये सिद्धीस जातील असे हे सिद्धस्थान.

 ➨चित्रा नक्षत्रात जे पूजा अर्चा व श्रीपाद चरितामृताचे पारायण करतील ते सर्व सिद्धी पावतील.

 ➨. येथे आलेल्या सर्वांची बाधा पिडा निरसन होऊन ते सुखी होतात.

 ➨ जे भक्त पिठापूरी वास्तव्य करुन श्रीपाद श्रीवल्लभांना आपल्या संकटातून रक्षणासाठी अर्चना करतील. त्यांची सर्व जबाबदारी श्रीपाद श्रीवल्लभ घेतील.                                                          

आपणही या स्थानी भेट देऊन पुण्यप्राप्ती करावी व श्रीपाद वल्लभ यांचे आशीर्वाद घ्यावे .शुभम भवतु ।


||श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये ||

!!श्रीगुरुदेव दत्त!!

 

No comments:

Post a Comment