स्वामीजींनी गुळवणी महाराजांना प्रेमभराने पाटावर बसवून स्वतः खुर्चीवर बसले. स्वामींन भोवती महाराष्ट्रीयन मंडळी कमी आणि कानडी मंडळी जास्त होती. स्वामीजींनी गुळवणी महाराजांची तब्येत बरी नसती हे जाणून त्याबद्दल आस्थेने विचारपूस केली. त्यावेळी श्री पृथ्वीराज यांनी स्वामींना सांगितले कि, "महाराजांची तब्येत बरी नसताना त्यांनी पुण्याहून इकडे येण्याचे कष्ट घेतले." यावर स्वामीजी पृथ्वीराजांना म्हणाले, "बाळा, थोर ते केव्हाही थोरच असतात." स्वामीजींनी करंडी भरून फळे महाराजांना अभिमंत्रित करून प्रसाद रूपाने देऊन म्हणाले, "शक्य झाल्यास दरवर्षी श्री तुळजाभवानीची महापूजा करीत जावी. तिच्या कृपेने तुमचा उत्कर्ष होत जाईल आणि व्याधीही आटोक्यात राहील." गुळवणी महाराजांचा गुरुद्वादशीसाठी वाडीची वारी करण्याचा नियम होता. स्वामीजींनी सुचविल्याप्रमाणे दरवर्षी तुळजापूरची वारीही त्यांनी आदरपूर्वक सुरु केली. शेवटी शेवटी प्रकृती बरी नसताना देखील त्यांनी तुळजापूरची वारी कधी चुकवली नाही. इतकेच नव्हे तर त्यांच्या पश्चात त्यांच्या उत्तराधिकाऱ्याने वाऱ्या कराव्यात अशा सुचना त्यांनी देऊन ठेवल्या होत्या. त्याप्रमाणे त्या आजही चालु आहेत. गुळवणी महाराजांना डॉक्टरांनी सांगितले होते कि पुढे त्यांची व्याधी वाढत जाणार हे भाकीत खोटे ठरले. त्यानंतर स्वामीजींनी सर्व शिष्यांना आज्ञा केल्याप्रमाणे सर्वजण बाहेर आले आणि स्वामीजी आणि गुळवणी महाराज यांचे काही वेळ एकांतात बोलणे झाले. त्यानंतर गुळवणी महाराजांनी निरोप घेताना स्वामींना नमस्कार केल्यावर स्वामीजींनी त्यांना उठवून पुन्हा मिठी मारली आणि कानात काहीतरी बोलले. नंतर श्री पृथ्वीराज यांनी महाराजांना फराळासाठी काही हवे का याची आस्थेने चौकशी केली त्यावर गुळवणी महाराज म्हणाले, 'कधी नव्हे इतके माझे पोट भरले आहे शिवाय स्वामीजींनी इतकी फळे दिली आहेत! आता काही नको.'
श्री पृथ्वीराज, गुळवणी महाराजांना सोडण्यासाठी बाहेर आले. आजूबाजूला कुणी नाही हे पाहून काही क्षण स्तब्ध राहून गुळवणी महाराजांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि त्यांनी श्री पृथ्वीराजांना कडकडून मिठी मारली. थोडासा संकोच वाटून श्री पृथ्वीराजांनी स्वतःला सोडवून म्हणाले महाराज आपण काय करीत आहात, मी एक पामर असे म्हणून त्यांनी गुळवणी महाराजांना नमस्कार केला. मग श्री पृथ्वीराजांनी गुळवणी महाराजांना विचारले, आपल्याला आनंद झाला ना? यावर महाराज म्हणाले, मला केवढा आनंद झाला हे सांगण्यासाठी माझ्याजवळ शब्दच नाहीत आणि परत त्यांचा कंठ दाटून आला. मग पृथ्वीराजांनी त्यांना विचारले डॉक्टरांची परवानगी नसताना आपण कसे आलात त्यावर गुळवणी महाराज म्हणाले, 'तुम्ही ज्यावेळेस आमंत्रण देण्यासाठी पुण्यात आला होतात, तेंव्हा माझ्या मनात असा विचार आला कि, श्री टेंबे स्वामी महाराजांसारखे त्रैलोक्य विख्यात, समर्थ सद्गुरु माझ्या पाठीशी असताना दुसऱ्या संन्याशाच्या दर्शनासाठी जाण्याचे मला काय कारण! असा विचार करून स्वस्थ बसलो. आज पहाटे टेंबे स्वामी माझ्या स्वप्नात आले जे गेल्या ३५ वर्षात घडले नव्हते. जणू ते हयात आहेत असेच मला वाटले. मी लगबगीने पुढे झालो, तोच स्वामी खुर्चीवर स्थानापन्न झाले. स्वप्नात मला आश्चर्य वाटले कारण टेंबे स्वामी नेहमी जमिनीवर, व्याघ्राजिन घालून बसत पण खुर्चीवर कधी बसत नसत. मी भावविवश होऊन त्यांच्या जवळ गेलो तर त्यांच्या अवती भोंवती कानडी बोलणारे असंख्य शिष्य मंडळी दिसली याचे देखील आश्चर्य वाटले कारण स्वामि भोवती नेहमी महाराष्ट्रीय आणि गुजराती शिष्य मंडळी असायची. मग मी त्यांच्या जवळ जाऊन पाया पडू लागलो पण त्यांनी मला पकडून आलिंगन दिले. मी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणांजवळ बसलो. बऱ्याच वर्षानंतर सद्गुरू भेटीची अशी पर्वणी लाभली होती. बरं आता ये! असे म्हणून त्यांनी मला निरोप दिला आणि पुन्हा मिठी मारली आणि कानामध्ये कुजबुजले.' इतक्यात जागे होऊन पाहिले तर पहाटेचे ४—३० वाजले होते. तेवढ्यात तुम्ही आमंत्रण दिल्याचे आठवले. मला कळून चुकले कि 'श्रीधर स्वामींच्या दर्शनासाठी जावे' असा टेंबे स्वामींचा संकेत आहे आणि लागलीच प्रातर्विधी आणि आन्हिक उरकून इकडे आलो. इथे आल्यावर श्री श्रीधर स्वामींचे दर्शन झाल्यावर सगळ्या गोष्टी स्वप्नातल्या सारख्या घडल्या जसे स्वामींचे खुर्चीवर बसणे, भोवती कानडी शिष्य, श्रीधर स्वामींनी आलिंगन देणे आणि टेंबे स्वामींच्याच वात्सल्यपूर्ण नजरेने पाहणे आणि यावर कळस म्हणजे निरोप घेताना टेंबे स्वामी कानात जे वाक्य बोलले तेच वाक्य आणि त्याच लकबीत माझ्या कानात श्री श्रीधर स्वामी बोलले आणि निरोप देताना 'आता तरी खूण पटली ना?' असे म्हणून अर्थपूर्ण कटाक्ष टाकला. मी पुरता भारावून गेलो. आता मला कळाले कि टेंबेस्वामींनी मला श्री श्रीधर स्वामीजींच्या दर्शनाचा केवळ संकेत दिला नाहीतर दोन्ही महापुरुष एकरूपच आहेत याची खात्री पटली. इतकेच नाही तर टेंबे स्वामी हे श्रीधर स्वामींच्या रूपाने पृथ्वीतलावर वावरत आहेत अशी माझी दृढ धारणा झाली आहे. तुम्ही मला इथे येण्याचे आमंत्रण दिल्यामुळे आज मी हा महान लाभ घेऊ शकलो. तुम्ही श्रीधर स्वामीजींचे शिष्य असल्यामुळे तुम्ही खुप भाग्यवान आहात.
यावर श्री पृथ्वीराज त्यांना म्हणाले कि आजची दिव्य प्रचिती तुम्हाला यावी ही साक्षात टेंबे स्वामीजींची योजना होती मी फक्त निमित्त मात्र. यावर गुळवणी महाराज म्हणाले, "यापुढे केव्हाही श्रीधर स्वामीजी पुणे परिसरात येतील तेंव्हा मला आगाऊ सुचना देत जा! मी त्यांच्या दर्शनाची एकही संधी चुकविणार नाही, हे माझे निर्धार वचन आहे." गुळवणी महाराजांनी म्हटल्याप्रमाणे श्रीधर स्वामीजी केव्हाही पुणे परिसरात आल्यावर त्यांच्या दर्शनाची संधी दवडली नाही वेळ प्रसंगी थंडीत वाट पहात रस्त्यात उभे रहात.

No comments:
Post a Comment