Sunday, June 22, 2025

श्री क्षेत्र लातूर (अलक्षपुर ) दत्त मंदिर

 

श्री क्षेत्र लातूर  (अलक्षपुर ) दत्त मंदिर




 श्री  क्षेत्र लातूर येथील दत्तमंदिराचा  उल्लेख  श्री गुरुचरित्रातील १४ व्या अध्यायात ५२ व्या ओवीत आढळतो  .श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज श्री क्षेत्र काशी येथून  संन्यास घेऊन आल्यावर एकांतवासात राहाण्यासाठी  सर्व शिष्यांना तीर्थ यात्रेस पाठवून दिले व आपण स्वतः निरंजन वनात एकांतात राहिले ती ही जागा होय . अत्यंत पवित्र व अत्यंत प्रासादिक . सदर स्थान हे साधने साठी परायणासाठी अत्योत्तम  आहे . हे परम पवित्र स्थान   प पू  बालस्वामी यांनी विकसित केले . तसेतर बालस्वामी हे  स्वामी महाराजांचे अंतरंग शिष्य नंदिनामा यांचे वंशातील  जे असे भाग्यवान ज्यांना सद्गुरू सहवास प्रत्यक्ष लाभला .महाराजांनी सांगितलेले ' तुझ्या घराण्यात ८ यती होतील ..आणि बालस्वामी हे८ वे यति होय .ते मूळचे कर्नाटक मधील बसवकल्याणचे  त्यांनी येथे येऊन जागा विकत घेऊन मंदिर बांधले व उत्खननात अनेक सद्गुरुंच्या प्रासादिक वस्तू  मिळाल्या   बालस्वामी यांनी ८ व्या वर्षी गायत्री  पुरश्चरण केले व १२ व्या वर्षी संन्यास घेतला व बाल गोविंद सरस्वती झाले व १४ व्या वर्षी दंड घेऊन दंडिस्वामी झाले अत्यंत लहान वयात संन्यास घेतल्याने त्यांचे नामाभिमान बालस्वामी असे झाले. त्यांनी गाणगापूर प्रमाणे येथेही निर्गुण पादुका स्थापून त्यांची सेवा केली व  गाणगापूर प्रमाणे भक्तांची सर्व मनोरथ येथेही पूर्ण होतात याची ग्वाही दिली व सेवा व उपासना करविली .अनेक भक्त येथे येऊन सद्गुरू कृपा प्राप्त करून घेत आहेत.

हे प्रसिद्ध व प्रासादिक श्री दत्त मंदिर लातूर शहरात  लातूर औसा रस्त्यावर आहे. १९६४-६५ मध्ये सदानंद पीठाचे प्रमुख श्री बालगोविंदानंद सरस्वती यांनी लातूरला गुरु अदृश्यपणे राहण्याची जागा मानले. श्री बालगोविंद सरस्वती महाराज कर्नाटकातील बसव कल्याण या छोट्याशा गावाचे रहिवासी आहेत. कोल्हापूर येथील श्रीमती व्ही.जी. कुलकर्णी बालगोविंद सरस्वती यांच्या वंशज होत्या. त्या १९६६ मध्ये लातूरमध्ये आल्या होत्या. त्यांनी गरीब शेतकऱ्याकडून जमीन खरेदी केली. त्यांनी येथे स्वयंभू पादुका स्थापन केल्या  आणि त्या दिवसापासून या मंदिरात   दत्त जयंतीचा कार्यक्रम साजरा केला जात आहे. त्यांनी त्यात खूप चांगले योगदान दिले आहे. प्रथम ते एक लहान मंदिर होते, त्यानंतर ते मोठ्या मंदिराच्या रूपात पुनर्निर्मित केले जाते. मुख्य गाभारासमोर एक मोठा सभामंडप आहे. या सभामंडपात सुमारे ४० फूट लांब आणि४० फूट रुंद असा एक सभामंडप आहे. हा मंदिर परिसर चार भागात विभागलेला आहे. पहिल्या भागात शिवलिंग आणि विठ्ठल व रुख्मिणी मातेची मूर्ती आहे. दुसऱ्या भागात शिवपिंड, गणपती आणि मारुतीची मूर्ती आहे. आणि तिसऱ्या आणि चौथ्या भागात, भगवान दत्ताच्या दोन प्रकारच्या मूर्ती स्थापित केल्या आहेत. व्यासपीठाखाली एक कोठडी आहे. कोठडीत अनेक अग्निकुंड /होमकुंड  मंदिराच्या आत  आहेत.


दत्तक्षेत्र लातूर हे पूर्वीचे अलक्षपूर ,श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांचे पट्टशिष्य माधव सरस्वती यांची समाधी देखील या ठिकाणी आहे . नंदीनामा यांच्या तेराव्या पिढीतील पूज्य गोविंदानंद सरस्वती म्हणजेच बालस्वामी यांनी लातूरला त्यांना मिळालेल्या प्रेरणेनुसार एक जागा विकत घेऊन उत्खनन केले ,त्यात एक यज्ञवेदी ,गुरुमहाराजांच्या पादुका ,पूजेतील बाण ,आणि भस्मामध्ये व्यवस्थित ठेवलेली ५५ अध्यायांची पोथी मिळाली   आजही या सर्व वस्तू येथे संग्रहीत आहेत  याच परिसरात एक जुना औदुंबर वृक्ष आहे.
येथे नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या गाणगापूर प्रमाणे निर्गुण पादुका आहेत . येथे शिवपिंडी आहे .येथे त्रिकाळ आरती नैवेद्य व अन्नदान असते .मंदिर परिसर अत्यंत पवित्र असून  सर्वत्र प्रासादिक अनुभूती येते .
अनेक दत्तभक्त येऊन येथे अभिषेक लघुरुद्र नैवेद्य व गुरुचरित्र परायणाची सेवा करतात .स्वामीजींच्या उपस्थितीत अधिक प्रसन्नता जाणवते.
  आता येथे सापडलेली हि पोथी देखील सिद्ध नामधारक संवादाची आहे . यावर नाव होते" गुरुचरित्र परमामृत ." या पोथी बरोबर अन्य काही पोथ्या मिळाल्या  . त्यात श्री माधवसरस्वती जीवनचंद्रिका हि एक पोथी होती . हि पोथी देखील सिद्ध नामधारक संवादाची आहे . आळंदचे प्रख्यात दत्तसंप्रदयाचे संशोधक भीमाशंकर देशपांडे यांनी बालस्वामींच्या सहकार्याने गुरुचरित्र परमामृत हि ५५ अध्यायांची प्रत प्रसिद्ध केली . यात वेगवेगळ्या पंचकांना वेगवेगळी नावे दिली आहेत . अवतार पंचक ,कृपा पंचक ,तपश्चर्या पंचक ,यात्रावळी पंचक , प्रबोध पंचक , क्षेत्र पंचक आणि शेवटचे महत्वाचे प्रसाद पंचक . श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांच्या सर्व लीला यात विस्तारपूर्वक दिल्या आहेत . ६८४ पृष्ठांचा हा  ग्रंथ शेवटच्या तरंगाध्यायाबरोबर समाप्त होतो . गुरुचरित्र अभ्यासकांकरिता हा एक महत्वाचा ठेवा आहे .
आता श्री गुरुचरित्र परंकथामृत.या ग्रंथाचे विषयी थोडी माहिती पाहूया....
श्रीगुरुचरित्र परम कथांमृत जे लातूर येथे उत्खनन करताना प्राप्त झाले, काय आहे त्यात, चला जाणून घेऊ या...

लातूर म्हणजे पूर्वीचे अलक्षपूर

इथे उत्खननात मिळालेली श्रीगुरुचरित्राची प्रत ही विस्तारित अतिशय स्वरूपाची असून याला श्रीगुरुचरित्र परम कथामृतम म्हटले जाते . 

अकरा पंचक, पंचावन्न अध्याय असे या श्रीगुरूचरित्राचे स्वरूप आहे . 

या श्रीगुरुचरित्राचा विस्तारित भाग सध्या प्रचलित श्रीगुरुचरित्रा पेक्षा बराच मोठा आढळतो आणि बहुधा हा विस्तार अध्यायाच्या शेवटास आहे .

विस्तारीत भाग म्हणजे नेमके काय ? 
एक उदाहरण घ्यावयाचे झाल्यास श्रीगुरुचरित्राचा  दहावा अध्याय घेऊ . या अध्यायात सध्या प्रचलित श्रीगुरुचरित्रात शेवटी वल्लभेश ब्राह्मणाने  इच्छा भोजन घालून आपल्या नवसाची फेड केली. आणि अश्विन वद्य द्वादशीला श्रीपाद श्रीवल्लभ दत्त महाराज हे गंगेत अदृश्य झाले. हा उल्लेख येऊन अध्याय समाप्त होतो. मात्र श्रीगुरुचरित्र परम कथांमृतात वल्लभेश ब्राह्मणा बरोबर तो जीवदान मिळालेला तस्कर देखील कुरवपूर यात्रेला आल्याचा उल्लेख आहे .

निघाले पुढे उभयता कुरवपुरासी ll७५ll  कृष्णातीरी दोघेही येती l नदी एकमेका आधारे ओलांडिती l पैलतीरी जाती भक्तगणे 
परिचिति l तयासवे संवादी रमला स्वये ll ७६ ll 

खाली गुहेत श्रीपाद श्रीवल्लभ दत्त महाराज समाधी अवस्थेत असल्याचे भिंतीतून आरपार चित्र त्याला दिसले. सभोवताली काही पार्षद गण सेवेसाठी उभे होते. आश्चर्य म्हणजे वाटेत बरोबर असलेले तस्कर वल्लभेशाला तिथे गण म्हणून उभे दिसले. आणि दत्त महाराज पतितोद्धारक कसे आहेत याची खूण पटली . भगवंताच्या या लीलेने तो नतमस्तक झाला .



इथे या ग्रंथाची आणखीन एक उल्लेखनीय गोष्ट अशी कि यातील कथाभागात श्रीगुरुमहाराजांच्या लीलांचे सूक्ष्म अवलोकन केलेले आहे . एक छोटेसे उदाहरण म्हणजे बाविसाव्यात श्रीगुरुमहाराज गाणगापूर येथे येतात, व धनहीन अशा ब्राह्मणाकडे भिक्षेला गेले. त्या घरी दारापाशी येताच त्यांनी उच्चार केला -- ॐ नारायण हरि -- हा उल्लेख प्रचलित गुरुचरित्रात नाही. तसेच पशु जीवाचेही कष्ट परिहरत हा उल्लेख  देखील प्रचलित गुरुचरित्रात नाही. 
 
गुरुचरित्र परमकथामृताची गोडी काही औरच आहे. विस्तारित भाग आणि सूक्ष्म अवलोकन यांनी वाचनात अगदी तल्लीनता येते.

सर्व दत्तभक्तांनी या पवित्र क्षेत्री जाऊन दत्तगुरूंचे आशीर्वाद घ्यावे .
या क्षेत्री कसे जावे ...

श्री दत्त मठ लातूर सकाळी ०६:०० ते रात्री ०९:३० पर्यंत ७ दिवस खुले असते.
श्री दत्त मठ लातूर  रेल्वे स्टेशन हे श्री दत्त मठ लातूरपासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. ते त्यापासून जवळजवळ १.५४ किलोमीटर अंतरावर आहे.
मंदिर संपर्क व पत्ता
९ एचपी५+एमव्ही२, औसा रोड (एसएच-३), जुनी आदर्श कॉलनी, लातूर, महाराष्ट्र ४१३५१२, भारत
फोन+९१ २३८२ २४१ १३१
श्री दत्त मठ लातूरचे वेळापत्रक

सोमवार सकाळी ०६:०० - रात्री ०९:३०
मंगळवार सकाळी ०६:०० - रात्री ०९:३०
बुधवार सकाळी ०६:०० - रात्री ०९:३०
गुरुवार सकाळी ०६:०० - रात्री १०:३०
शुक्रवार सकाळी ०६:०० - रात्री ०९:३०
शनिवार सकाळी ०६:०० - रात्री ०९:३०
रविवार सकाळी ०६:०० - रात्री ०९:३०
 
 दत्त संप्रदायातील सर्व उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरे होतात . सदर मंदिर निर्माणात त्यांचेच वंशातील श्रीमती कुलकर्णी ताई यांचे मोठे आर्थिक योगदान आहे .
 : पहाटे पासून रात्रीपर्यंत सर्व उपचार व उपासना येथे  अत्यंत श्रद्धेने पार पाडल्या जातात . या मंदिर परिसरात अनेक होमकुंड आहेत .
सर्व दत्तभक्तांनी अवश्य या दत्तक्षेत्री दर्शन घेऊन यावे व सद्गुरूंचा परिसस्पर्श लाभलेल्या  या दत्तक्षेत्रातून सकारात्मक ऊर्जा घेऊन यावी . निर्गुण पादुकांच्या पवित्र  दर्शनाने आपणासही अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही

।। शुभम भवतु ।।

No comments:

Post a Comment