Wednesday, May 14, 2025

! संकष्टी चतुर्थी ! ....संकष्ट चतुर्थी हे एक व्रत आहे.


 
!! संकष्टी चतुर्थी !!

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

संकष्टी  चतुर्थी बाबत या लेखात आपण माहिती घेऊया ..

  • संकष्टी चतुर्थी केव्हा येते त्याची कथा संकष्टीची काय आहे?
  • संकष्टी व्रत कसे करावे ?
  • गणेश मंत्र १२ राशींचे  कोणते ?

हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणार्‍या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात.

एका वर्षात १२ आणि त्यावर्षी अधिकमास आल्यास १३ संकष्टी चतुर्थी येतात. 
प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो.गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्व विशेष आहे.

संकष्ट चतुर्थी हे एक व्रत आहे. 

 ते पुरुष व स्त्रिया दोघांनी करायचे असते. हे व्रत दोन प्रकारांनी करतात.

 १. मिठाची संकष्ट चतुर्थी व 
२. पंचामृती चतुर्थी. 

दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा.

यासाठी मोदक करण्याची पद्धती आहे.त्यानंतर भोजन करावे.या व्रताचा काल आमरण,एकवीस वर्षे किंवा एक वर्ष असा आहे.व्रतराज या ग्रंथात हे व्रत सांगितले आहे.

संकष्टी दिवशी काय करावे?

संकष्टी दिवशी गणपतीची मनोभावे पूजा केली जाते. यादिवशी सकाळी उठून घरी गणपतीची पूजा केली जाते तसेच गणपती मंदिरामध्ये गणेशाची पूजा आणि दर्शन घेतले जाते. शक्य असल्यास गणेशभक्त उपवास ठेवतात. संकष्टी दिवशी लसुण, कांदा विरहीत जेवण बनवलं जातं. नैवेद्याला गोडाचा पदार्थ किंवा मोदक बनवले जातात. उकडीचे मोदक खाण्याचे आरोग्यदायी फायदे !

आयुष्यातील वाईट प्रसंगांचा सामना करण्यासाठी, आर्थिक, मानसिक, अध्यात्मिक सुख मिळवण्यासाठी गणपतीची पूजा केली जाते. कोणत्याही शुभकार्यामध्ये गणपतीला पहिलं स्थान दिलं जातं. त्यामुळे सुख-समृद्धीसाठी दर महिन्यात येणार्‍या संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची पूजा करणं फायद्याचं समजलं जातं.

संकष्ट चतुर्थीची कथा

पूर्वी यादवकुळात सत्राजित नावाचा एक राजा होऊन गेला. त्याने शंभर वर्षे सूर्योपासना करून सूर्यास प्रसन्न करून घेतले. प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य स्यमंतक मणी दिला. हा मणी तेजाने प्रतिसूर्यच होता. या मण्यामुळे राजास दररोज सोने प्राप्त होई. त्यामुळे सत्राजित राजा दररोज सहस्त्र भोजन घालायचा.सत्राजिताकडील स्यमंतक मण्याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने सत्राजिताकडे या मण्याची मागणी केली. परंतु स्त्राजिताने तो मणी देण्यास नकार दिला.पुढे एक दिवस सत्राजिताचा बंधु प्रसेन हा स्यमंतक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसेनाला ठार मारले व तो दिव्यमणी पळविला. पुढे त्या सिंहास जांबुवंत नावाच्या राजाने ठार मारुन तो स्यमंतक मणी आपल्या कन्येच्या गळ्यात बांधला.इकडे प्रसेन स्यमंतक मणी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्राजित राजाने हे कृष्णकारस्थान असल्याचा आरोप केला. ही गोष्ट कृष्णास कळली. आपल्याकडील चोरीचा आळ दूर करण्यासाठी मग कृष्ण प्रसेनाच्या शोधार्थ निघाला.प्रसेनाला शोधत कृष्ण अरण्यात येऊन पोहोचला. पाहतो तर काय? एके ठिकाणी प्रसेनमरुन पडलेला. जवळच सिंहाच्या पाऊलखुणा उमटल्या होत्या. त्यांचा माग काढीत कृष्ण जांबुवंताच्या गुहेपाशी येऊन पोहोचला व स्यमंतक मणी शोधू लागला. अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबुवंताच्या कन्येने ओरडावयास सुरुवात केली. तिचे ओरडणे ऐकून जांबुवंत तेथे आला. त्याने कृष्णावर हल्ला केला. त्या दोघांचे युद्ध एकवीस दिवस चालले होते. त्यामुळे द्वारकेत घबराट झाली.गोकुळात नंद-यशोदेला या युद्धाची वार्ता कळली. तेव्हा ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले. त्यांनी संकटहर्त्या श्रीगणेशाचे संकष्टी चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले.

श्रीगणेशाच्या कृपाप्रसादाने श्रीकृष्णास विजयप्राप्ती झाली. जांबुवंताने स्यमंतक मणी आणि आपली कन्या जांबुवंती श्रीकृष्णास दिली. गोकुळात, द्वारकेत सगळीकडे आनंदीआनंद झाला.

श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा आळ आला. त्याचे कारण असे सांगतात.

 पूर्वी भाद्रपदात गणेशचतुर्थी दिवशी सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गाईच्या खुरांच्या ठशात पावसाचे पाणी साचले होते. त्यापाण्यात कृष्णाने चंद्र पाहिला होता. श्रीगणेशाने चंद्रास दिलेला शाप श्रीकृष्णास अशा प्रकारे भोवला होता. परंतु संकष्टी चतुर्थी व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला.श्रीकृष्णाने स्यमंतक मणी सत्राजिताला परत दिला. सत्राजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णास दिली. दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीस संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात. या व्रतामुळे संकटहर्त्या श्रीगणेशाची कृपा लाभते. भक्तांची संकटे दूर होतात. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात.

संकष्टी चतुर्थी व्रत करण्याची सोपी विधी

प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षच्या चतुर्थी तिथीला संकट चतुर्थी व्रत केलं जातं.
 
दिवसभर निराहार उपवास केला जातो.
 
सकाळी लवकर उठून अंघोळ करून उत्तर किंवा पूर्व दिशेकडे मुख करून गणपतीची पूजा करावी.
 
गणपतीला दूर्वा, लाल फुलं, रोली, फळं, पंचामृत अर्पित करावे
 
मोदक किंवा तिळाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवला जातो.
 
संकष्टी चतुर्थी व्रत कथा श्रवण करावी आणि गणपतीची आरती, स्तुती करावी. 
 
चंद्रोदय झाल्यावर चंद्राला अर्घ्य द्यावे नंतर व्रत सोडावे.

बारा राशींचे हे १२ गणेश मंत्र

शास्त्रामध्ये गणपतीची भक्ती चेतना, बुद्धी, सौभाग्य, आणि सिद्धी प्रदान करणारी मानली गेली आहे. गणपतीचे स्मरण केल्याने सर्व  देवी-देवतांची कृपा आपल्याला प्राप्त होऊ शकते. यामुळे जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी गणपतीची पूजा करण्याचे महत्व सांगितले गेले आहे.

 प्रत्येक पक्षातील चतुर्थीस विशिष्ट नावे आहेत. 
शुक्ल पक्षातील चतुर्थीस संकष्टी. मंगळवारी आली तर तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात.

 आम्ही तुम्हाला विविध सोपे गणेश मंत्र व पूजा उपाय सांगणार आहोत. 
*या मंत्राचा जप केल्यास तुम्हाला सुख, सौभाग्य, ऐश्वर्य, यश प्राप्त होईल.*
 
मेष -  गणपतीची पूजा करताना 'ऊँ विघ्नराजाय नम:' या मंत्राचा उच्चार करीत, रेशमी ओढणी अर्पण करावी. वैवाहिक जीवनात प्रेम व विश्वास वाढेल
वृषभ -  'ऊँ भक्तविघ्नविनाशाय नम:' या मंत्राचा उच्चार करीत, गणपतीला पाच वेगवेगळ्या लाडूंचा नैवेद्य दाखवावा. भौतिक सुख प्राप्त होईल. 
मिथुन -  'ऊँ भक्तवांछितदायकाय नम:' या मंत्राचा उच्चार करीत, गणपतीच्या प्रतिमेवर दुध अर्पण करावे. पैशाची कमतरता व कुटुंबातील कलह दूर होतील. 
कर्क -  'ऊँ दूर्वाबिल्वप्रियाय नम:' या मंत्राचा उच्चार करीत, गणपतीला दुर्वा अर्पण कराव्यात. मानसिक आणि शारीरिक त्रास दूर होईल. 
सिंह - 'ऊँ सर्वसिद्धिप्रदाय नम:' मंत्राचा उच्चार करीत स्फटिकाच्या गणेश मूर्तीला शेंदूर लावावा. समाजात मान-सन्मान वाढेल. 
कन्या - 'ऊँ अकल्माषय नम:' या मंत्राचा उच्चार करीत, लाल चंदन गणपतीला अर्पण करावे. कार्यक्षेत्रातील व कुटुंबातील समस्या दूर होतील
तूळ -  'ऊँ हरये नम:' या मंत्राचा उच्चार करीत, आंब्याच्या पानांनी गणपतीची पूजा करावी. जीवनातील दुःख आणि कष्ट दूर होतील. 
वृश्चिक -  'ऊँ शान्ताय नम:' या मंत्राचा उच्चार करीत गुळ, दही आणि साखरच नैवेद्य दाखवावा. तुमच्यावर कोणतेही संकट येणार नाही.
धनु -  'ऊँ प्रसन्नात्मने नम:' या मंत्राचा उच्चार करीत गणपतीला पंचामृताचा अभिषेक करावा. आर्थिक लाभाच्या शक्यता वाढतील 
मकर -  'ऊँ गजाननाय नम:' या मंत्राचा उच्चार करीत, तांब्याचे नाणे काळ्या दोर्यात बांधून गणपतीला अर्पण करा. धनलाभ होईल.
कुंभ -  'ऊँ ज्ञानिने नम:' या मंत्राचा उच्चार करीत, गणपतीला गुलाबाचे फुल अर्पण करावे. अपत्य सुख प्राप्त होईल. 
मीन -  'ऊँ चतुराय नम:' या मंत्राचा उच्चार करीत, पिवळा रेशमी कपडा गणपतीला अर्पण करावा. नोकरी, व्यापारात लाभ होईल

संकष्ट चतुर्थी  हे श्रीगणपतीच्या व्रतांपैकी हे दर महिन्यास येणारे एक संकटनाशक, महासिद्धिदायक असे व्रत आहे.* 
प्रत्येक महिन्याच्या वद्य पक्षात जी चतुर्थी असते, त्या चतुर्थीस 'संकष्टी -चतुर्थी ' असे म्हण्तात. या दिवशी दिवसभर उपवास करावयाचा असतो. रात्रौ चंद्रदर्शनानंतर गणपतीची षोडशोपचारे पूजा करावी व त्यानंतर चंद्राची पूजा करुन त्याला व चतुर्थी तिथीला अर्घ्य द्यावे, अशी पद्धत आहे. श्रीगणपती ही विघ्ननाशक देवता असल्याने हा या व्रतप्रभावाने ती प्रसन्न होते आणि सर्व विघ्नांचा नाश होतो, असे महात्म्य आहे. या दिवशी चंद्रदर्शनानंतर चंद्राची पूजा करुन पारणे करावयाचे असते; हे ह्या व्रताचे मुख्य अंग आहे. या दिवशी संध्याकाळी आंघोळ करुन श्रीगणपतीच्या पूजेची तयारी करून घ्यावी. पुजास्थानी घरातील गणेशमूर्ती असेल तर ती ठेवावी. नसल्यास सुपारी अक्षतापुंजावर ठेवून तिची गणपती म्हणून पूजा करावी. अथर्वशीर्षाची २१ आवर्तने करावीत. पूजा षोडशोपचारांनी पंचामृतअभिषेकासह करावी. आवर्तनाच्या प्रत्येक वेळी

'श्रीविघ्नविनायकदेवताभ्यो नमः ।'
असे म्हणावे. प्रारंभी संकल्प करताना
 
'अमुक संकटनाशनार्थ' असे म्हणून त्या संकटाचा उल्लेख करावा.चंद्राला अर्घ्य द्यावा. त्याच्या दिशेने गंध, फूल,अक्षता उडवाव्या व नमस्कार करावा. चतुर्थी तिथीला अर्घ्य ताम्हनात द्यावा व शेवटी महानैवेद्य दखवून पारणे करावे. कथा ऐकावी. यायोगे सर्व संकटाचा नाश होतो, व गणेशकृपा होते, असा अनुभव आहे.
मंगळवारी येणार्‍या चतुर्थीला 'अंगारकी संकष्टी ' म्हणतात. हा एक महान योग आहे. हे संकष्टीचे व्रत यथासांग करणार्‍यास वर्षातील सर्व चतुर्थी केल्याचे पुण्य मिळते. यथाविधी व षोडशोपचारांनी गणपतीचे पूजन केल्यानंतर चंद्रोदय होताच चतुर्थी तिथीस, चंद्रास आणि श्रीगजाननास अर्घ्यप्रदान करावे. गजाननाची करुणा भाकावी. या व्रताच्या प्रभावाने साधकाची सर्व विघ्ने, संकटे दूर होतात. त्यास सर्व ऐहिक सुखे प्राप्त होऊन मंगलमूर्तीचे दर्शन होते, साक्षात्कार होतो, अशी लोकांत श्रद्धा आहे.

ओम गं गणपतये नमः

No comments:

Post a Comment